esakal | Bihar Election:मुख्यमंत्री 'जेडीयू'चाच; भाजपने नितीशकुमारांना मानले मोठा भाऊ
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election bjp accepted nitish kumar as cm candidate

बिहार निवडणुकीत भाजपला पहिल्या घासालाच खडा लागला. चिराग पासवान Chirag Paswan यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करत, आपण भाजपसोबत असल्याचे जाहीर केल्यानं एनडीए फुटली.

Bihar Election:मुख्यमंत्री 'जेडीयू'चाच; भाजपने नितीशकुमारांना मानले मोठा भाऊ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत केलेल्या चुकांची सुधारणा भाजपने बिहार निवडणुकीत केल्याचं दिसतंय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून फूट पडली. लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी वेगळी चूल मांडलीय. पण, भाजपने आपण संयुक्त जनता दलासोबत अर्थात नितीशकुमार (NitishKumar) यांच्यासोबत आहोत. हे स्पष्ट केले असून, आकडे काहीही असले तरी नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं भाजपनं आज, जागा वाटपानंतर स्पष्ट केलंय. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - जाणून घ्या बिहारमधलं एनडीएचं जागा वाटप

एनडीएमध्ये फूट
बिहार निवडणुकीत भाजपला पहिल्या घासालाच खडा लागला. चिराग पासवान Chirag Paswan यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करत, आपण भाजपसोबत असल्याचे जाहीर केल्यानं एनडीए फुटली. पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने जागा वाटपात हट्टी भूमिका घेतल्यानंतर मतभेद टोकाला गेले. पासवान यांच्या पक्षातूनही 140 हून अधिक उमेदवार तयार असल्याची वक्तव्यं आल्यानंतर संयुक्त जनता दलाने भाजपवर दबाव आणला आणि अखेर एनडीएत फूट पडली. 

आणखी वाचा - एनडीएमध्ये सामील होणार 'नवा गडी'

आज काय घडले? 
आज भाजप, संयुक्त जनता दल, जितन राम मांझी यांचा एचएएम आणि विकासशील एन्सान पार्टी या चार पक्षांची एनडीए आघाडी झाली आहे. या आघाडीचे जागा वाटप आज जाहीर करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदावरून आघाडीत वाद झाल्यामुळं सुशीलकुमार मोदी Sushilkumar Modi यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी कोणत्याही जर तर परिस्थितीत नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे सुशीलकुमार मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकजनशक्ती पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान  Ram Vilas Paswa सध्या अत्यवस्थ असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत चिराग यांनी असे निर्णय घेतले नसते, असं सांगून सुशीलकुमार मोदी यांनी चिराग यांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच भाजप नितीशकुमार यांच्यासबोत असल्याचा पुनरुच्चार केला.  

मोदींचा फोटो वापरण्यास नकार 
चिराग पासवान यांनी, 'आमचा भाजपशी काही वाद नाही, पण आम्हाला नितीशकुमारांचे नेतृत्व मान्य नाही.' अशी भूमिका घेतली होती. त्यावर संयुक्त जनता दलाने भाजपवर दबाव टाकून याविषयी खुलासा करण्याचा आग्रह धरला होता. अखेर भाजपने पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो प्रचारात न वापरण्याच्या सूचना लोक जनशक्ती पक्षााला दिल्या आहेत.