Bihar Election - धक्कादायक! भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची हत्या; डोक्यात झाडली गोळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

 बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (bihar Election 2020) मतमोजणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या आदल्यादिवशी आरा शहरातील सुंदरनगर मोहल्ल्याजवळ एका वकिलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हल्लेखोरांनी जवळून दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी डोक्यात लागली. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना पाटणा इथं हलवण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचा - Bihar Election: 2005 मध्ये पासवान यांनी बिघडवलं होतं गणित, चिराग इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव प्रीतम नारायण सिंह असं असून सुंदर नगर इथं राहत होते. त्यांची पत्नी नीलू सिंह या भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा आहेत. हल्ला केल्यानंतर शस्त्रे नाचवत हल्लेखोर निघून गेले. दोघांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

वकिलाच्या मुलाने यामागे त्याचे काका असल्याचा आरोप केला आहे. भरदिवसा गोळीबाराच्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक हर किशोर राय यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे वाचा - भाजपचे पासवान 'अस्त्र' यशस्वी! जेडीयू ठरणार छोटा भाऊ

न्यायालयातील काम संपल्यानंतर वकिल प्रीतम नारायण सिंह गाडीने त्यांच्या घरी परत येत होते. त्यावेळी मोहल्ल्याच्या जवळ पोहचले तेव्हा बाइकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. जखमी अवस्थेत असलेल्या वकील प्रीतम यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर पाटणा इथं पाठवण्यात आलं. पाटनातील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा बार असोसिएशनने हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election bjp leaders husband shot dead in ara before vote counting