Bihar Election: 2005 मध्ये पासवान यांनी बिघडवलं होतं गणित, चिराग इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

2005 मध्ये रामविलास पासवान यांनी सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली होती. त्यावेळी बिहारमध्ये एकाच वर्षांत दोन वेळा निवडणूक घेण्याची वेळ आली होती. 

पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहता ही लढत आणखी चुरशीची होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. अनेकांनी त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. चिराग पासवान किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतात, असेही बोलले जात आहे. परंतु, त्यांनी जेडीयू आणि आरजेडी विरोधात ज्या पद्धतीने प्रचार केला आहे. त्यावरुन या दोन्ही पक्षांशी जुळवून घेणे कठीण वाटत आहे. त्यामुळे चिराग पासवान 2005 मधील इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतील असे म्हटले जात आहे. 2005 मध्ये त्यांच्या वडिलांनी म्हणजेच रामविलास पासवान यांनी सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली होती. त्यावेळी बिहारमध्ये एकाच वर्षांत दोन वेळा निवडणूक घेण्याची वेळ आली होती. 

दुपारी 1.30 पर्यंत जेडीयू-भाजपच्या एनडीए 126 जागांवर आहे तर आरजेडी-काँग्रेसप्रणित महाआघाडी 106 जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. तर लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) 2 जागांवर आघाडीवर आहे. काही वृत्त वाहिन्यांनी लोजपा 3 ते 4 जागांवर आघाडीवर असल्याचे दाखवले होते. जर हे आकडे बदलले तर चिराग पासवान हे अपक्षांसह काही छोट्या पक्षांच्या मदतीने किंगमेकर ठरु शकतात. 

हेही वाचा- Bihar Election: तेजस्वी समर्थकांनी हातात घेतले 'मासे'; घरासमोर केली गर्दी

चिराग पासवान यांनी प्रचारादरम्यान जाहीररित्या भाजपचे समर्थन केले होते. त्यांनी स्वतःला पंतप्रधान मोदींचे हनुमान म्हटले होते. लोजपाचे सरकार सत्तेवर आल्यास नितीशकुमार यांना कारागृहात पाठवू असेही त्यांनी म्हटले होते. याचाच अर्थ चिराग यांनी भाजपाविरोधा मैत्रीपूर्ण लढत लढली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी भाजपला मत देण्याचेही आवाहन केले होते. भाजप एकट्याच्या जीवावर बहुमताच्या जवळ पोहोचली तर लोजपाच्या साथीने सत्ता स्थापन करता येईल, असा त्यांचा अंदाज होता. परंतु, त्यांचे सर्व आराखडे सध्या तरी चुकल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा- Bihar Election: ... तर तेजस्वी ठरतील सर्वात युवा मुख्यमंत्री, करतील 3 विक्रम नावावर

2005 ची पुनरावृत्ती होणार ? 
त्यामुळे चिराग पासवान हे 2005 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का असा सवाल विचारला जात आहे. त्यांचे वडील रामविलास पासवान यांनी 15 वर्षांपूर्वी पेच निर्माण केला होता. 2005 च्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामविलास पासवान यांनी आपला नवा पक्ष लोजपाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. 

त्यांनी 243 मतदारसंघ असलेल्या विधानसभेत 29 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी कोणालाच बहुमत मिळाले नव्हते. 75 जागांसह आरजेडी सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तर नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील जेडीयूला 55 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसकडे केवळ 10 जागा आल्या होत्या. 

हेही वाचा- Bihar Election Update: बिहारच्या सत्तेची 'मॅजिक फिगर' कोणाच्या हातात?

रामविलास पासवान किंगमेकरच्या भूमिकेत आले होते. परंतु, त्यांनी त्यावेळी अट ठेवली होती. जो पक्ष मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री पद देईल त्याला पाठिंबा दिला जाईल असे त्यांनी म्हटले होते. यासाठी कोणताच पक्ष तयार झाला नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सहा महिन्यांपर्यंत सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून विधानसभा भंग केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडणूक झाली. यावेळी लालूंबरोबर पासवान यांनाही मोठा धक्का बसला आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election result 2020 chirag paswan ljp may kingmaker in hung assembly