गुन्हेगारांची 'बिहार निवडणूक'; २० जणांवर महिला अत्याचार, २१ जणांवर हत्येचे गुन्हे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 October 2020

बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्राबल्य असल्याचे बिहार इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च (एडीआर) या संस्थांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

नवी दिल्ली- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकीय पक्षांनी निवडणूकीत उमेदवारी देऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे सरसकट उल्लंघन बिहार विधानसभा निवडणूकीत झाले असून राष्ट्रीय जनता दल, भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष, काँग्रेस या सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पहिल्या टप्प्यातील 1064 पैकी 31 टक्के उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद असून 29 जणांवर महिलांवरील अत्याचाराचे तर 21 जणांवर हत्येचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्राबल्य असल्याचे बिहार इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च (एडीआर) या संस्थांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आज पत्रकार परिषदेत हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात असलेल्या 1066 पैकी 1064 उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यातील 328 म्हणजे 31 टक्के उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून 23 टक्क्यांविरोधात म्हणजेच 244 जणांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे 375 उमेदवार (35 टक्के) कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती प्रती उमेदवार 1.99 कोटी रुपये आहे.

जगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती

राजद आघाडीवर

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वाधिक म्हणजे 41 पैकी 30 उमेदवार आहेत. तर पार्टी विथ डिफरन्स म्हणविल्या जाणाऱ्या भाजपचे 29 पैकी 21 उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त लोकजनशक्ती पक्षाचे 41 पैकी 24, काँग्रेसचे 21 पैकी 12 संयुक्त जनता दलाचे 35 पैकी 15 आणि बहुजन समाज पक्षाचे 26 पैकी 8 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यातील 29 उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असून तीन उमेदवारांवर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर 21 उमेदवारांवर हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

करोडपतीही भरपूर

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या 41 पैकी 39 उमेदवार कोट्यधीश आहेत. तर जदयुचे 31 पैकी 31, भाजपचे 29 पैकी 24, लोकजनशक्ती पक्षाचे 41 पैकी 30, काँग्रेसचे 21 पैकी 14 आणि बहुजन समाज पक्षाचे 26 पैकी बारा उमेदवार करोडपती आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election criminals contesting election in bihar