esakal | ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं
sakal

बोलून बातमी शोधा

Gupteshwar Pandey.

राजकारणात यायचं म्हणून पोलिसी पेशाही गेला आणि आता राजकारणाची स्वप्ने ही स्वप्नेच राहिली. 

ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून गुप्तेश्वर पांडे चांगलेच चर्चेत होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावर मुंबई पोलिसांना धारेवर धरत पांडेंनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. अर्थातच, यामागे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्वकांक्षा असल्याचं बोललं जात होतं. सरतेशेवटी झालंही तसंच!
राजकारणात उतरण्यासाठी उत्साही असणाऱ्या गुप्तेश्वर पांडेनी आपल्या पोलिस महासंचालक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एनडीएतील जेडीयूकडून तिकीट मिळवण्यासाठी धडपड केली. त्यांची एकूण धडपड पाहता त्यांना तिकीट मिळण्याचीही शक्यती होतीच. मात्र, आता झालंय तिसरंच! जेडीयूने गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट द्यायला नकार दिलाय. राजकारणात यायचं म्हणून पोलिसी पेशाही गेला आणि आता राजकारणाची स्वप्ने ही स्वप्नेच राहिली. 

हेही वाचा - 'माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसतो पण पंतप्रधानांसाठीच्या आलिशान विमानाबाबत कोण बोलणार?'

बिहारमधील बक्सर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्यास पांडे इच्छुक होते. पण, एनडीएत झालेल्या जागावाटपात बक्सर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. जेडीयू आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर त्यात पांडेंच नावच नसल्याचं समोर आलं. कदाचित भाजपाकडून त्यांना तिकीट मिळेल, अशी आशा होती. मात्र, भाजपने या जागेवर परशुराम चतुर्वेदी या आपल्या उमेदवाराला तिकीट दिलं. त्यामुळे, या दोन्हीही पक्षांनी पांडे यांना डावललं असल्याची चर्चा आहे. 

त्यांना या जागेवरुन तिकीट मिळेल अशी आशा होती, मात्र जेव्हा त्यांना तिकीट मिळणार नाहीये हे स्पष्ट झालं तेंव्हा त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. याबाबत आपलं म्हणणं त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे मांडलं आहे. ते म्हणतात, मी माझ्या अनेक शुभचिंतकांच्या फोनने त्रस्त झालो आहे. मी त्यांची चिंता आणि काळजी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्यावर सगळ्यांनाच ही आशा होती की मी निवडणूक लढवेन मात्र यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवत नाहीये. हताश-निराश होण्यासारखी कोणती गोष्ट नाहीये. धीर ठेवा. माझं आयुष्यच संघर्षमय राहिलं आहे. मी आयुष्यभर जनतेच्या सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करु नका. बिहारच्या जनतेला माझं आयुष्य समर्पित आहे. माझी जन्मभूमी बक्सरच्या मातीला आणि तिथल्या सर्व जाती-धर्माच्या सगळ्या लहान-मोठ्या भावा-बहिणी-मातांना आणि युवकांना माझा प्रणाम. आपलं प्रेम आणि आशार्वाद असंच राहुद्या... असं बोलून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. 

हेही वाचा - भाजप नेत्यांची ‘एलजेपी’त आवक; चिराग पासवान यांना साथ
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गुप्तेश्वर पांडेनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीही घेतली होती. त्यांच्या या स्वेच्छानिवृत्तीमागे राजकीय महत्वकांक्षा हे कारण असल्याचं बोललं जात होत आणि ते साक्षात दिसूनही आलं मात्र पांडे यांची गेल्या काही दिवसांपासूनची धडपड व्यर्थ गेल्याचं बोललं जात आहे.