भाजप नेत्यांची ‘एलजेपी’त आवक; चिराग पासवान यांना साथ

भाजप नेत्यांची ‘एलजेपी’त आवक; चिराग पासवान यांना साथ

पाटणा - बिहारच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोकजनशक्ती (एलजेपी) पक्ष बाहेर पडल्यानंतर भाजप व संयुक्त जनता दला(जेडीयू)चे जागा वाटप काल झाले. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे भाजपचे अनेक नेते आता ‘लोजप’ला जवळ करू लागले आहे. या पक्षात भाजपमधून ‘आयारामां’ची आवक सुरू झाली आहे. यामुळे ‘जेडीयू’च्या प्रमुख नेते सावध झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एलजेपी’कडे भाजप नेत्यांचा ओढा वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडलेले आणि झारखंडमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेले राजेंद्रसिंह हे २०१५ मधील निवडणुकीत बिहारला आले. दिनारा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, पण पदरी हार पडली. मनोहरलाल खट्टर यांच्या प्रमाणे राजेंद्रसिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार सांगण्यात येत होते. बिहारमधील भाजपमध्ये त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे नियोजन त्यांनीच केले होते. ते आता बिहारचे उपाध्यक्ष आहेत. असे असले तरी  राजेंद्रसिंह ‘एलजेपी’त प्रवेश केला आहे. दिनारामधून त्यांची लढत ‘जेडीयू’च्या  उमेदवारांबरोबर होणार आहे. 

छोटे सरकार लालूंच्या छावणीत
बिहारमधील जे ‘बाहुबली’ नेते ‘एनडीए’बरोबर होते ते आता ‘आरजेडी’त प्रवेश करीत आहेत. या‘बाहुबलीं’कडून लालू प्रसाद यादव यांचा पक्षाला पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. एकेकाळी नितीश कुमार यांचे अत्यंत खास असलेले ‘बाहुबली’ नेते अनंतसिंह उर्फ छोटे सरकार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)ची वाट धरली आहे. त्यांनी बुधवारी मोकामा मतदारसंघातून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या छोटे सरकारांवर अनेक गंभीर गुन्हे  दाखल आहेत. 

‘जेडीयू’विरोधात लढत
राजेंद्रसिंह यांच्याप्रमाणे भाजप आमदार असलेल्या उषा विद्यार्थी यांच्यासह भाजपचे अनेक नेते चिराग पासवान यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे भाजपातून ‘एलजेपी’त सहभागी होणारे बहुतेक उमेदवार नितीश कुमार यांच्या उमेदवारांविरोधात मैदानात उतरत आहेत. निवडणुकीनंतरची ही तयारी असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

‘झामुमो’ स्वबळावर लढणार
झारखंड मुक्ति मोर्चाने (झामुमो) लालू यादव यांच्या पक्षाशी नाते तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव हे ‘झामुमो’ला दोन जागा देणार होते. पण उपकार म्हणून जागा नको असल्याचे सांगत हा प्रस्ताव ‘झामुमो’ने फेटाळला आहे. आता हा पक्ष सात जागांवर उमेदवार उभे करणार आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारमध्ये ‘जेडीयू’चे एक नेते  मंत्री आहेत. ‘झामुमो’बरोबर नात्यात बिघाड झाल्याचा परिणाम रांचीतील तुरुंगात लालूप्रसाद यादव यांना मिळणाऱ्या  सुविधांमध्ये होऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे. लालू यांना नुकतेच रुग्णालयाच्या वॉर्डमधून संचालकांच्या बंगल्यात ठेवले होते. त्याविरोधात काही जण न्यायालयात गेले आहेत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com