
कम्युनिस्ट पार्टीचे नेता कन्हैया कुमार यांनी बिहार निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे
नवी दिल्ली- कम्युनिस्ट पार्टीचे नेता कन्हैया कुमार यांनी बिहार निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे. भाजप 'चिराग' आपल्या हातात घेऊन, नितीश कुमारांचे घर जाळण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने नितीश कुमारांशी साथ केली आहे, पण ते कधीही त्यांना धोका देऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला आहे. कन्हैया कुमार एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
बिहारमध्ये सरकारविरोधात लाट आहे. ही लाट मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. भाजप ज्या फांदीवर बसते तिलाच कापून टाकते. 15 वर्षाच्या सत्तेनंतर बिहारची जनता नितीश कुमार यांच्यावर नाराज आहे, त्यांच्या सरकारला कंटाळली आहे. भाजपलाही याची जाण आहे, त्यामुळे ते लोक जनशक्ती पार्टीचे नेता चिराग पासवान यांची मदत घेऊन नितीश कुमारांना उद्धवस्त करु पाहात आहे, असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला आहे.
माझ्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्या; चंद्रशेखर आझाद यांचा गंभीर आरोप
बिहारमध्ये केवळ कोरोना महामारी नाही तर, बेरोजगारीची महामारीसुद्धा आहे. लॉकडाऊनच्या माध्यमातून अनेकांचा रोजगार काढून घेण्यात आला. आता लोकांनी बदलाचा संकल्प केला आहे. यावेळी लोक असे सरकार निवडेल जे तरुणांना रोजगार देईल, शिक्षकांना समान वेतन देईल, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव देईल आणि निष्पक्ष परीक्षा करु शकेल, असंही ते म्हणाले आहेत.
राजदवर लागलेल्या आरोपांबाबत कन्हैया कुमार यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ''छोड़ो कल की बातें कल की बात पुरानी'' आपण आता जुन्या बिहारची चर्चा करायची नाही. आपल्याला नवा बिहार बनवायचा आहे. ''जन-जन ने ये ठाना है ,नया बिहार बनाना है''.
बिहारमध्ये 243 जागांवर लढण्यासाठी आमच्याकडे संसाधन नाहीत. त्यामुळे आम्ही काही मोजक्या जागा लढवत आहोत. जोश सोबतच 'होश' असणे आवश्यक आहे. बिहारच्या लोकांनी बदलाचे स्वप्न पाहिले आहे. केवळ निवडणूक लढणे आमचे लक्ष्य नाही. पार्टी जे सांगेल ते आम्ही करु, राजकारण टीम वर्कने चालते, असं कन्हैया कुमार म्हणाले. बिहार निवडणूक bihar election