esakal | Bihar Election : महागठबंधनची साथ सोडून विकासशील इंसान पार्टीचा एनडीएप्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

VIP Joins NDA

महागठबंधनचे जागावाटप जाहिर करताना या जागावाटपावर नाराजी व्यक्त करत मुकेश सहनी यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला होता. 

Bihar Election : महागठबंधनची साथ सोडून विकासशील इंसान पार्टीचा एनडीएप्रवेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टीने एनडीएत प्रवेश केला आहे. जागावाटपांसंदर्भात झालेल्या वादानंतर मुकेश सहनी यांनी राजदच्या नेतृत्वातील महागठबंधनची साथ सोडत भाजपाप्रणित एनडीएची वाट धरली आहे. बुधवारी भाजपने या पक्षाला आपल्या आघाडीत घेत आपल्या वाट्यातील काही जागा विकासशील पार्टीला देण्याची घोषणा केली. जेडीयूसोबतच्या जागावाटपात भाजपाला अर्ध्या म्हणजेच 121 जागा मिळाल्या होत्या. त्यातील 11 जागा या विकासशील इंसान पार्टीला देण्यात येणार आहेत. भाजपा भविष्यात मुकेश सहनी यांच्या पक्षाला विधानपरिषदेची एक जागाही देणार आहे, असं म्हटलं जात आहे. जागावाटप जाहिर करताना या जागावाटपावर नाराजी व्यक्त करत मुकेश सहनी यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. 

हेही वाचा - गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश

एनडीएत सामिल होताना सहनी यांनी म्हटलं की, ज्या आघाडीतून आम्ही राजकीय करिअरची सुरवात केली होती, पुन्हा एकदा आम्ही त्याच घरात परतलो आहोत. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आजपासून आम्ही संपूर्ण ताकदीनीशी बिहार एनडीएसोबत आहोत. नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्याला काम करावयाचे आहे. 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत विकासशील इंसान पार्टी भाजपासोबत होती. या जागावाटपात विकासशील इंसान पार्टीला ब्रह्मपुर, बोचहा, गौरा बोराम, सिमरी बख्तियारपुर, सुगौली, मधुबनी, केवटी, साहेबगंज, बलरामपुर, अली नगर, बनियापुर या जागा देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी

बुधवारी पाटण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत विकासशील इंसान पार्टी एनडीएत सामिल होत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी, भाजपा बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल, बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सुशील मोदी उपस्थित होते. यावेळी सुशील मोदी म्हणाले की, यावेळच्या निवडणुकीत एनडीएकडून सगळ्यात अधिक तिकीट हे अतिमागासवर्गीय समाजातील लोकांना देण्यात येत आहे. बिहारमध्ये आज 16100 सरपंच अति मागासवर्गीय समाजाचे आहेत, हे एनडीए सरकारमुळेच शक्य झालं आहे.