esakal | गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

narendra Modi

2002 च्या गुजरात दंगलींचा आरोप मोदींवर केला गेला होता. मात्र, या आरोपातून डागाळलेली आपली प्रतिमा बदलून ती विकासपुरुष या प्रतिमेने झाकोळून टाकण्यात ते यशस्वी ठरले. 

गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य आणि केंद्र सरकारचा   प्रमुख म्हणून पत्करलेल्या भुमिकेला आज 20 वर्षे झाली. आजच्याच दिवशी 2001 साली त्यांनी  गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ पहिल्यांदा घेतली होती. म्हणजे, सरकारप्रमुख म्हणून मोदी आज विसाव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आज भारतातील एक प्रभावशाली व्यक्ती आणि राजकारणी म्हणून नरेंद्र मोदींचे नाव वादातीत आहे. गुजरातमध्ये मोदींनी सलग तीन वेळेस मुख्यंत्री म्हणून पदभार स्वीकारत काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. 

गुजरातचे मुख्यमंत्री मोदी
नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आजच्या दिवशी शपथ घेतली. यानंतर राजकोट विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. यामध्ये जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना राज्याची जबाबदारी सोपवली. सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींनी राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी विकासपुरुष ही आपली प्रतिमा सातत्याने जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी व्हायब्रंट गुजरातसारखे कार्यक्रम राबवून गुंतवणुकदारांना गुजरातकडे आकर्षित केले. त्यांच्या याच प्रयत्नामुळे गुजरातला एक विकसित राज्य म्हणून प्रतित करण्यात ते यशस्वी ठरले. या काळात मोदींवर 2002 च्या गुजरात दंगलींचा आरोप ताजा होता. ही दंगल सरकारपुरस्कृत होती, असाही आरोप मोदींवर केला गेला होता. मात्र, या आरोपातून डागाळलेली आपली प्रतिमा बदलून ती विकासपुरुष या प्रतिमेने झाकोळून टाकण्यात ते यशस्वी ठरले. 

हेही वाचा - म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा; शोपियात अजुनही चकमक सुरु

पंतप्रधान पदाचे दावेदार मोदी
2014 साली लोकसभा निवडणुकांच्या आधीच मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं गेलं होतं. गुजरात विकास मॉडेलचा गवगवा करत त्यांना भारताचा विकासपुरुष म्हणून पुढे आणलं गेलं. 2014 च्या निवडणुकांत अभूतपुर्व अशा विजयाने त्यांनी 284 जागांवर आपली विजयाची पताका फडकावली. मोदींच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भाजपाला एवढे मोठे बहुमत प्राप्त झाले. सत्तेत आल्यावर मोदींनी जनधन योजना, मुद्रा योजना, जन सुरक्षा योजना, उज्ज्वला योजना, उजाला योजना, पीएम आवास योजना, सौभाग्य योजना, भीम-यूपीआय योजना, आयुष्यमान भारत आणि पीएम-किसानसारखे जनकल्याणकारी योजना साकारल्या. 2019मध्ये जनतेने मोदी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकून प्रचंड बहुमताने सत्ता सोपवली. बिगरकाँग्रेसी पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ राज्य करणारे ते पहिले पंतप्रधानही बनले आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयींच्या नावावर हा रेकॉर्ड होता.  

हेही वाचा- पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारला खुले आव्हान!
मोदींनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय
अमेरिकेच्या प्रतिष्ठीत टाइम मॅगझिनने मोदींना 2013 साली पर्सन ऑफ द ईअर घोषित केले होते. पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्याच कार्यकाळात त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. मोदींनी देशात स्वच्छता अभियानाची सुरवात केली. 2017 साली जीएसटी लागू केला. 2019 मध्ये जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370 कलम काढून टाकले. सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला. 2020 साली प्रलंबित राममंदिराचा मार्ग मोकळा केला. 

मोदींवरचे आरोप आणि टीका
- 2002 च्या गुजरात दंगलीचे जबाबदार असा नरेंद्र मोदींवर डाग आहे. 
- मोदींनी 2016 मध्ये देशात लागू केलेल्या नोटबंदीनंतर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. 
- देशातील स्वायत्त संस्थानांची स्वायत्तता धोक्यात आणली असल्याचा आरोप मोदींवर केला जातो. 
- माध्यमांचे स्वातंत्र्य मोदींच्या राजवटीत कमी झाल्याचेही बोलले जाते. 
- आजवर देशात कधीच इतक्या खाली जीडीपी गेला नव्हता, तो मोदींच्या कार्यकाळात गेला. मोदींनी अर्थव्यवस्था रसातळाला नेली, असा आरोप आहे.
- जगात प्रभाव टाकणाऱ्या 100 लोकांच्या यादीत समावेश करताना मोदींनी देशातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आणली, असं टाइम मॅगझीनने त्यांच्यावर टीका केली आहे.
- मोदींच्या राजवटीत धर्मनिरपेक्ष उदारमतवादी असुरक्षित असल्याचा सूर आळवला गेला आहे. त्यांच्या राज्यात मुस्लिम-दलित असुरक्षित झाले असल्याचाही आरोप आहे.