खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाविरोधात लढणारी प्रभावी अशी उपचार पद्धती शोधून काढली आहे, असा दावा केला आहे.

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण मानवजातीलाच वेठीला धरले आहे. अनेक देशांत कोरोनामुळे हाहाकार उडाला असून त्यामुळे अपरिमित असे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनावरील औषधाची वाट पाहत आहे. जगभरात अनेक लशींची निर्मिती आणि त्यावरील चाचणीची प्रक्रिया सुरु आहे. भारतातही तीन लशींवर सध्या काम सुरु आहे. मात्र मान्यताप्राप्त कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही. प्लाझमा थेरपीचाही वापर कोरोनावरील उपचार म्हणून करण्यात आला मात्र तो प्रभावी नसल्याचे आढळून आले. मात्र आता भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाविरोधात लढणारी प्रभावी अशी उपचार पद्धती शोधून काढली आहे, असा दावा केला आहे. या क्लिनिकल ट्रायललाही मंजूरी दिली गेली आहे.

आयसीएमआर आणि हैद्राबादमधील बायोलॉजिकल ई लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने एकत्र येऊन अँटिसेरा विकसित केलं आहे. याची मानवी चाचणी घेण्यासाठीही मंजूरी मिळाली आहे. विकसित केली गेलेली अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. यामध्ये एखाद्या विशिष्ट अशा आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं प्रमाण अधिक असतं. कोरोनासारख्या विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचं असतं. त्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनद्वारे दिलं जातं. थोडक्यात, भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अँटिबॉडी विकसित केल्या आहेत.

हेही वाचा - गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश

यापूर्वी हेपॅटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, रेबीज, टिटॅनस अशा अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर या पद्धतीनेच उपचार विकसित करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसवरील उपचार विकसित करण्यासाठी आता घोड्यांना  Sars-Cov-2 चं इंजेक्शन देऊन हे अँटिसेरा विकसित करण्यात आलं आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. हे अँटिसेरा आयसीएमआर आणि हैद्राबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटीकल कंपनीने मिळून विकसित केलं आहे. घोड्यांवर सेराचा अभ्यास करुन हे विकसित केलं आहे. 

हेही वाचा - म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा; शोपियात अजुनही चकमक सुरु

कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णांच्या प्लाझमाचा वापरही याप्रकारे केला जातो. मात्र, प्रत्येक व्यक्तीत प्लाझमाची पातळी वेगळी असते, त्यामुळे त्याचा वापर करताना अडचण येते. मात्र, हे विकसित केले गेलेले अँटिसेरा कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी फायद्याचं ठरेल असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antisera treatment on coronavirus icmr clinical trail approval for animal antibodies