Bihar Election : गळ्यात गळे आणि हातात हात चालणार नाहीत; बिहार प्रचार रॅलींसाठी नियमावली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

कोरोना काळात इतक्या मोठ्या लोकसंख्येला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठीची व्यवस्था उभी करणे, हेदेखील आव्हानच आहे.

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. कोरोना काळात होणारी ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. कोरोना काळात इतक्या मोठ्या लोकसंख्येला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठीची व्यवस्था उभी करणे, हेदेखील आव्हानच आहे. अशात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे पाळले जाणे, जास्त महत्वपूर्ण आहे. निवडणुकीच्या आधी होणाऱ्या प्रचार सभांमध्ये देखील ही काळजी व्यवस्थितपणे घेतली जाणे आवश्यक आहे. 

बिहार सरकारने कोणत्याही प्रकारच्या इनडोअर अथवा आऊटडोअर प्रचार रॅलीमध्ये सामिल होणाऱ्यांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार प्रचार रॅलीत सामिल होणाऱ्या लोकांना तोंड आणि नाक संपूर्णत: झाकून टाकेल असा मास्क चेहऱ्यावर परिधान करणे अनिवार्य आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत नेत्यांना एकमेकांशी हस्तांदोलन करता येणार नाहीये तसेच एकमेकांना मिठीही मारता येणार नाहीये. 

हेही वाचा - Corona Update : कोरोना प्रादुर्भावाचा 70 लाखांचा टप्पा; गेल्या 24 तासात 73,272 नवे रुग्ण

गृह विभागाकडून जाहीर केलेल्या आदेशान्वये ही नियमावली पाळली जाणार आहे. इनडोअर स्वरुपात जर काही प्रचार रॅलीचे आयोजन होणार असेल तर 200 हून अधिक लोक त्या रॅलीत समाविष्ट होऊ शकणार नाहीत. रॅली मोकळ्या ठिकाणी असेल, तरीही मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. याव्यतिरिक्त रॅलीत सामिल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दरम्यान सहा फुटांचे अंतर असणे, आवश्यक आहे.  

नियमावलीमध्ये म्हटलं गेलंय की नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे आणि गळ्यात गळे घालून भेट घेणे टाळावे. प्रचार रॅलीच्या ठिकाणी टिश्यू पेपर उपलब्ध असायला हवा. तसेच, ज्या ठिकाणी ही रॅली पार पडणार आहे त्या ठिकाणाच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील त्या आयोजकांचीच राहिल. 

हेही वाचा - रेल्वे रिझर्व्हेशनच्या नियमांत आजपासून महत्वाचे बदल; प्रवाशांना होणार फायदा

बिहार विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी तीन टप्प्यत मतदान होणार आहे. पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा 3 नोव्हेंबर तर तिसरा 7 नोव्हेंबर रोजी पार पडेल. निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी घोषित केले जातील. निवडणुक आयोगाद्वारा बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 1,06,526 मतदान केंद्र स्थापन केले गेले आहेत. एकूण 7,29,27,396 मतदार आपला मताचा अधिकार बजावतील. बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त होणार आहे. त्याच्या आधीच नवीन सरकार लोकांद्वारे निवडणून येणे आवश्यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election new guidelines for election campaign dont hug & shake hand