रेल्वे रिझर्व्हेशनच्या नियमांत आजपासून महत्वाचे बदल; प्रवाशांना होणार फायदा

Railway
Railway

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तिकीटांच्या आरक्षणासंबंधीच्या नियमांमध्ये आज 10 ऑक्टोबर रोजी मोठे आणि महत्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन बदलांनुसार आता आरक्षणाचा दुसरा चार्ट रेल्वे स्टेशनवरुन सुटण्याच्या आधी अर्धा तास जाहिर केला जाईल. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन तास आधी हा चार्ट लावला जायचा. 

रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास आधी रिझर्व्हेशनची सोय
नव्या नियमांनुसार आता रेल्वे सुटण्याच्या आधी अर्धा तासापर्यंत रिझर्व्हेशन करण्याची  सुविधा मिळणार आहे. ही सुविधा करंट बुकिंग काऊंटर तसेच ऑनलाईन पद्धतीनेही उपलब्ध राहील. अनलॉक सुरु झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काही गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्यात येईल. स्पेशल रेल्वेसाठी पहिला चार्ट रेल्वे सुटायच्या आधी चार तास बनवला जातो. चार तास आधीपर्यंत बुकींग काऊंटरवरुन तिकीट घेतलं जाऊ शकतं आणि ते परतही केलं जाऊ शकतं. पहिला चार्ट बनल्यानंतर जे बर्थ रिकामे राहतात त्या बर्थसाठीचे आरक्षण हे रेल्वे सुटायच्या दोन तास आधी प्रवासी करु शकतात. 

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध
रेल्वे प्रशासनाकडून आज 10 ऑक्टोबर रोजी व्यवस्थेत बदल केला आहे. पहिला आरक्षण चार्ट रेल्वे सुटण्याच्या चार तासा आधी बनवला जाईल. दुसरा चार्ट रेल्वे सुटण्याआधी अर्धा तासापर्यंत बनेल. प्रवाशी रिकाम्या बर्थवर रिझर्व्हेशन करु शकतात आणि तिकीटही परत करु शकतात. ज्या स्टेशनवर करंट बुकींग काऊंटर आहे, प्रवाशी तिथून तिकीट खरेदी करु शकतात. ई-तिकीटदेखील घेऊ शकतात. म्हणजेच प्रवाशी गाडी पकडण्याआधी घरातून निघल्यानंतर मोबाईलमधून ई-रिझर्व्हेशन तिकीट घेऊ शकतात. ज्यांना अचानकपणे प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी रेल्वेची ही सुविधा अत्यंत उपयोगाची आहे. 

भारतीय रेल्वेने 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू केल्याने रेल्वेसेवा बंद केली होती. मात्र, आता अनलॉकनुसार टप्प्याटप्प्याने रेल्वेसेवाही पुर्ववत होत आहे. प्रवाशी कामगारांना त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या होत्या. 

सण-समारंभाच्या काळात 200 रेल्वेगाड्या

येऊ घातलेल्या सण-समारंभाच्या काळात किती रेल्वे सोडल्या जातील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. काहीजण 100 तर काहीजण 50 रेल्वे सोडल्या जातील असा तर्क मांडत होते, जो रेल्वेने स्वत:च नाकारला. रेल्वे बोर्डाचे चेअरमननी हे स्पष्ट केलंय की सण-समारंभाच्या काळात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात 200 हून अधिक रेल्वेगाड्या सोडल्या जातील. गरज भासली तर ही संख्या आणखी वाढवण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com