esakal | Bihar Election: बिहारमध्ये कोणते स्टार चमकले अन् कोण हरले
sakal

बोलून बातमी शोधा

bihar_20rjd_20bjp

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांच्या एनडीए पक्षाने बहुमत प्राप्त केले

Bihar Election: बिहारमध्ये कोणते स्टार चमकले अन् कोण हरले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांच्या एनडीए पक्षाने बहुमत प्राप्त केले. यादरम्यान स्टार उमेदवारांच्या कामगिरीवरही सर्व देशाचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या मैदानात प्रथमच उतरलेले शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. स्वत:ला बिहारच्या भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित करणाऱ्या पुष्पम प्रिया या देखील पराभूत झाल्या.

तेजस्वी यादव यांचा दणदणीत विजय
तेजस्वी यादव (राघोपूर): राजदचे स्टार नेते तेजस्वी यादव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे सतीशकुमार यांना सुमारे ३५ हजार मतांनी पराभूत केले. तेजस्वी यांना ८७५३८ तर सतीशकुमार यांना ५२१३२ मते मिळाली.

तेजप्रताप यादव विजयी
तेजप्रताप यादव (हसनपूर): राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव हे हसनपुर मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी जेडीयूचे राजकुमार राय यांना पराभूत केले. तेजप्रताप यादव सकाळच्या मतमोजणीत पिछाडीवर पडले होते. परंतु कालांतराने त्यांची स्थिती सावरली. तेजप्रताप हे २११३९ मतांनी विजयी झाले.

"भाजपने रामविलास पासवानांचा राजकीय वारसा संपवला"

बांकीपूर येथे पुष्पम प्रिया चौधरी पराभूत
पुष्पम प्रिया चौधरी (बांकीपूर आणि बिस्फी): प्लूरल्स पक्षाच्या नेत्या ‘लंडन रिटर्न’ पुष्पम प्रिया चौधरी यांचा बांकीपूर मतदारसंघात पराभव झाला. त्या २९, ३४९ मतांनी पराभूत झाल्या. भाजपचे नितीन नवीन यांनी त्यांना पराभूत केले. बिस्फी जागेवर देखील त्यांचा पराभव झाला.

लव सिन्हा पराभूत
लव सिन्हा (बांकीपूर): शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव आणि कॉंग्रेसचे उमेदवार लव सिन्हा यांचा बांकीपूर मतदारसंघातून पराभव झाला. ते पहिल्यांदाच मैदानात उतरले होते. त्यांना भाजपचे नितीन नवीन यांनी पराभूत केले.

जीतनराम मांझी विजयी
जीतनराम मांझी (इमामगंज): हम (सेक्युलर) पक्षाचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी राजदचे उमेदवार उदय नारायण चौधरी यांचा पराभव केला. गेल्याही निवडणुकीत मांझी यांनी उदय नारायण चौधरी यांना २९ हजार मतांनी पराभूत केले होते. तेव्हा चौधरी हे जेडीयूचे उमेदवार होते.

चंद्रिका राय पराभूत
चंद्रिका राय (परसा): जेडीयूचे उमेदवार चंद्रिका राय राजदचे उमेदवार छोटेलाल राय यांच्याकडून पराभूत झाले. चंद्रिका राय हे लालू प्रसाद यादव यांचे व्याही. सुरवातीला ते राजदमध्ये होते. मात्र नोव्हेंबर २०१८ मध्ये तेजप्रताप यादव आणि ऐश्‍वर्या यांच्यात घटस्फोटाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील संबंध ताणले गेले. ते मागील निवडणुकीत राजदच्या तिकीटावर निवडून आले होते.

श्रेयसी सिंह विजयी
श्रेयसी सिंह (जमूई): भाजपच्या उमेदवार श्रेयसी सिंह यांनी राजदचे विजय प्रकाश यांचा पराभव केला. त्यांनी ४० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. श्रेयसी सिंह यांचे वडिल दिग्विजय सिंह केंद्राचे मंत्री राहिले आहेत. आई पुतुल देवी देखील खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी कधीही राजकारणात राहिल्या नव्हत्या. त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेमबाज आहेत. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

शरद यादव यांची कन्या पराभूत
सुभाषिनी यादव (बिहारीगंज): शरद यादव यांच्या कन्या आणि कॉंग्रेसच्या उमेदवार सुभाषिनी यादव यांचा पराभव झाला. जेडीयूचे आमदार निरंजनकुमार मेहता यांनी त्यांचा १९ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.

भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला; मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई

व्हिआयपीचे मुकेश पराभूत
मुकेश सहानी (सिमरी बख्तियारपूर): विकासशील इन्सान पार्टी म्हणजेच व्हीआयपीचे संस्थापक मुकेश सहानी यांचा केवळ एक हजार मतांनी पराभव झाला. राजदचे उमेदवार युसूफ सलाहुद्दीन आणि सहानी यांच्यात आज ‘कांटे की टक्कर’ पाहवयास मिळाली. शेवटी सलाहुद्दीन यांची सरशी झाली.

पप्पू यादव पराभूत
पप्पू यादव (मधेपूरा): जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष आणि प्रगतशील लोकशाही आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले पप्पू यादव यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. पप्पू यादव हे मधेपुरा मतदारसंघातून उभे होते. त्यांना २६,४६२ मते मिळाली. तेथे ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. राजदचे के. चंद्रशेखर विजयी झाले.

सुशांत सिंह यांचा भाऊ विजयी
बॉलिवूड अभिनेते दिवंगत सुशांत सिंह राजपूत यांचे बंधू आणि भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिंह ऊर्फ बबलू यांनी छातापूर मतदारसंघातून २०, ६३५ मतांनी विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे आलम आणि राजदचे विपिन कुमार सिंह यांना मागे टाकले.