Bihar Election : प्रचाराची रणधुमाळी शिगेला; PM मोदींच्या तीन तर राहुल गांधीच्या दोन सभा

modi in bihar.
modi in bihar.

नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी गतीमान होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दरम्यान होणारी ही देशातील पहिलीच निवडणुक आहे. असं असलं तरीही प्रशासनाने  जाहीर केलेल्या नियमांनुसार ही निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे आव्हान सगळ्यांवरच असणार आहे. सोशल डिस्टंन्सिगचा विचार करता यावेळी व्हर्च्यूअल प्रचारावर अधिक भर दिला गेला असला तरीही प्रत्यक्ष सभा देखील होत आहेत. बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीचे आव्हान आहे. आज शुक्रवारी एनडीएसाठी पंतप्रधान मोदी हे बिहारमध्ये तीन सभांना संबोधित करणार आहेत तर राहुल गांधी हे महाआघाडीसाठी दोन सभांमध्ये प्रचार करणार आहेत. 

पंतप्रधान मोदी राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाला पुन्हा सत्ता द्या असं आवाहन करण्यासाठी सासाराम, गया आणि भागलपूरमध्ये तीन सभांना संबोधित करणार आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे देहरी आणि भागलपूरच्या सभांमध्ये मोदींसोबत प्रचार करतील. 

हेही वाचा - काँग्रेस मुख्यालयावर पाटण्यामध्ये छापा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील आज बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ते भागलपूर जिल्ह्यातील कहलगांवमध्ये आणि नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित करतील. हिसुआमध्ये होणाऱ्या सभेला राहुल गांधीसोबत महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादवदेखील असतील. भाजपाने याआधीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसारख्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवलं आहे. 

काल गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बिहार निवडणुकीसाठी भाजप पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा वादग्रस्त ठरला आहे. यामध्ये भाजपने सत्ता आल्यावर कोरोनाचे मोफत लशीकरण करण्याचे वचन मतदारांना देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका या तीन टप्प्यात होत आहेत. येत्या 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com