Bihar Election - कुणी जिंकावं म्हणून नव्हे तर नितीशकुमार हरावेत म्हणून लोजपाचे होमहवन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

या होमहवनचं वैशिष्ट्य असं आहे की, हे होमहवन कुणाच्याही विजयासाठी नाहीये तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पराभव व्हावा, यासाठी आहे.

पाटना : आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणी अद्याप सुरु आहे. आणि मतमोजणी कल हे महागठबंधनच्याच बाजूने दिसून येत आहेत. बिहारमध्ये नेमकं कुणाचं सरकार येईल, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईलच. आम्हीच जिंकणार असा छातीठोक दावा सगळेच पक्ष करताना दिसतायत, मात्र आता बिहारमधील पाटण्यामध्ये होमहवन सुरु आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला अधिकाधिक जागा मिळाव्यात म्हणून निवडणुकीच्या मतमोजणी आधीच पूजापाठ केला जात आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'तेजस्वी भव: बिहार'; तेजप्रताप यादवांनी दिला लहान भावाला आशीर्वाद

या होमहवनचं वैशिष्ट्य असं आहे की, हे होमहवन कुणाच्याही विजयासाठी नाहीये तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पराभव व्हावा, यासाठी आहे. नितीश मुक्त सरकारसाठी लोजपाचे नेता पाटन्यातील मंदिरामध्ये होम हवन आणि पूजापाठ करताना दिसतायत. सध्या मतमोजणी सुरु आहे. आणि अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, बिहारमध्ये कुणाचे सरकार बनेल, यावरुन सगळीकडेच अशी आराधना सुरु आहे.

लोजपाच्या नेत्यांनी देखील पाटनामध्ये हवन केलं आहे. आणि ते हीच इच्छा व्यक्त करत आहेत की नितीश कुमार यांचं सरकार पुन्हा येऊ नये. पाटनामध्ये लोजपा नेते कृष्ण कुमार कल्लू यांच्या नेतृत्वात या यज्ञाचे आयोजन केलं आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा

बिहारच्या निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीने एनडीएशी राज्यात फारकत घेऊन नितीश कुमारांच्या जेडीयूविरोधात दंड थोपटला होता. जेडीयूच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, मोदींवर आपले प्रेम व्यक्त करत भाजपशी असलेलं आपलं सख्य कायम ठेवलं आहे. तसेच बिहारमध्ये भाजपा-लोजपा सरकार बनेल असा दावादेखील लोजपाच्या चिराग पासवान यांनी केला होता. लोजपाचे हा कुटील पवित्रा भाजपपुरस्कृत आहे, असं म्हटलं जात होतं. सध्याच्या आकडेवारीवरुन जेडीयूपेक्षा भाजपच अधिक जागांवर पुढे असल्यामुळे या दाव्याला कुठेतरी आधार मिळताना दिसतोय. निकाल अद्याप अस्पष्ट आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Result 2020 Homhawan by ljp leader in patana