esakal | Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?
sakal

बोलून बातमी शोधा

bjp & jdu

मतमोजणी सुरु झाल्यापासून एक बाब निश्चितच स्पष्टपणे दिसत आहे की, एनडीएमध्ये जेडीयूपेक्षा भाजपला अधिक जागांवर आघाडी आहे. 

Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी अद्याप सुरु आहे. या मतमोजणीपूर्वी जाहीर केलेल्या सर्वच अंदाजांनुसार महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल, असं चित्र होतं. सध्या तरी मतमोजणी दरम्यानच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर आहे. आकडेवारी अद्याप स्थिर नाहीये आणि ती अस्पष्टही आहे. असं असलं तरी मतमोजणी सुरु झाल्यापासून एक बाब निश्चितच स्पष्टपणे दिसत आहे की, एनडीएमध्ये जेडीयूपेक्षा भाजपला अधिक जागांवर आघाडी आहे. 

प्रादेशिक पक्षांना खाऊन टाकण्याची भाजपची प्रथा
सध्याच्या कलांनुसार भाजप 72 जागांवर तर जेडीयू 47 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आजवर प्रादेशिक पक्षांना हाताशी धरुन अनेक राज्यांत आपले राजकारण सुरु केले. मात्र, कालांतराने त्याच पक्षांची कोंडी करत त्यांच्यावर वरचष्मा गाजवायचा, असेच भाजपाचे लाँग टर्म धोरण राहिले आहे. महाराष्ट्रात देखील शिवसेना हा मोठा भाऊ होता. मात्र, कालांतराने भाजपने मोठा भावाच्या जागेवर आपला दावा केला. अगदी याच पद्धतीने बिहारमध्येही भाजपला राजकारण करायचं असल्याचं बोललं जातंय. 

हेही वाचा - Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

लोजपाच्या पवित्र्याचा फटका
जेडीयू पक्षाच्या जागा कमी येऊन भाजपच्या जागा वाढाव्यात यासाठी लोजपाला हाताशी धरुन भाजपाने कुटील डाव खेळल्याला एक प्रवाद या निवडणुकीत होता. लोजपाने एनडीएशी फारकत घेत राज्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याच्या पवित्रा घेतला होता. जेडीयूला आक्रमकपणे विरोध करत त्यांच्याविरोधात आपले उमेदवार लोजपाच्या चिराग पासवान यांनी उभे केले होते. चिराग पासवान यांनी भाजपशी आपलं सख्य मात्र तसंच ठेवलं होतं. भाजपला विरोध न करता उलट मोदींच्या सोबत राहण्याचा निर्णय लोजपाने घेतला होता. निवडणुकीनंतर भाजपा-लोजपा सरकार येईल असंही चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. मात्र, लोजपाच्या या पवित्र्याचा फटका जेडीयूला चांगलाच बसला असून त्यांची मते खाण्याचे काम लोजपाने केल्याचे दिसून येतंय. 

समसमान जागांचा फटका?
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधात एँटी-इन्कम्बसी असल्याचं बोललं जात होतं. याआधी कधीच भाजपाला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. मात्र, यंदाची ही निवडणूक जेडीयू-भाजपा यांनी समसमान जागांवर निवडणूक लढवली आहे. 243 पैकी भाजपाने 121 तर जेडीयूने 122 जागांवर ही निवडणूक लढवली आहे. भाजपला जागावाटपामध्ये समान वाटा देण्याचा फटका जेडीयूला बसला आहे, असंही म्हटलं जात आहे. आणि आतातर भाजप  हाच मोठा भाऊ बनण्याच्या वाटेवर आहे. 

हेही वाचा - Bihar Election Update: बिहारच्या सत्तेची 'मॅजिक फिगर' कोणाच्या हातात?

आजवर जेडीयू मोठा भाऊ
भाजप आणि जेडीयू यांनी कायम सोबत निवडणूका लढवल्या आहेत. मात्र, २०१५ मध्ये भाजपा आणि जेडीयू यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. जेडीयूने काँग्रेस आणि राजदसोबत आघाडी करुन ७१ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला फक्त ५३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, पुन्हा त्यानंतर जेडीयूने भाजपाशी घरोबा केला होता. आतापर्यंत मोठा भाऊ असलेला जेडीयू मात्र आता लहान भाऊ बनण्याच्या वाटेवर आहे. बिहारमधील निवडणुकीचं काय होईल हे अनिश्चित असलं तरीही भाजपने आपला वरचष्मा गाजवण्यात यश मिळवलं आहे, हे निश्चित!