Bihar Election: CM पदाची स्वयंघोषित दावेदार पुष्पम प्रिया दोन्ही जागांवर पिछाडीवर; EVM हॅकचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

पुष्पम प्रिया चौधरी यांनी वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानांवर जाहिराती देऊन मुख्यमंत्री पदासाठी आपण दावेदार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आपणच बिहारचा पुढचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीचा स्पष्ट निकाल अद्याप लागला नसून मतमोजणीचे कल सध्या एनडीएच्या बाजूने आहेत. निवडणुकपूर्व सगळ्या अंदाजामध्ये महागठबंधनला बहुमत मिळेल, असं वर्तवण्यात आलं होतं. असं असलं तरीही बऱ्याच जणांचं लक्ष हे पुष्पम प्रिया चौधरी यांच्याकडे होतं. हो... त्याच पुष्पम प्रिया चौधरी ज्यांनी वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानांवर जाहिराती देऊन मुख्यमंत्री पदासाठी आपण दावेदार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आपणच बिहारचा पुढचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र, सध्या पुष्पम प्रिया या दोन्हीही जागेवरुन पिछाडीवर आहेत. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर पुष्पम प्रिया चौधरी बिहारमध्ये EVM हॅक झाल्याचा दावा केला आहे. तसेच प्ल्यूरल्स पार्टीच्या मतांना भाजपाने आपल्या बाजूला वळवून घेतल्याचाही आरोप केला आहे. 

पुष्पम प्रिया चौधरी या लंडनमध्ये शिकेलल्या आहेत. त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्ल्यूरल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन करुन ठिकठिकाणी उमेदवार उभे केले होते. पाटणामधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून त्या उभ्या राहील्या होत्या. पुष्पम प्रिया यांनी बांकीपुर जागेवरुन नितीश कुमारांसहित तेजस्वी यादव यांनाही बांकीपुर जागेवरुन लढण्याचे आव्हान दिले होते.

हेही वाचा - Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे
सध्या या जागेवर नितिन नवीन हे भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांना शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकीटावरुन लढत दिली होती. याच जागेवर आता पुष्पम प्रिया यांचे डिपॉझीट देखील जप्त होण्याच्या मार्गावर आहे. मधुबनी बिस्फी जागेवरुन देखील पुष्पम प्रिया यांनी निवडणूक लढवली आहे. या जागेवर राजदच्या फैयाज अहमद आणि भाजपाचे हरिभूषण ठाकूरही निवडणूक लढवत आहेत. 2015 साली या जागेवरुन राजदचे फैयाज अहमद सलग दोनवेळा आमदार बनले होते आणि आता ते हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. सध्या पुष्पम प्रिया या तिसऱ्या नंबरवर आहेत. तर फैयाज अहमद हे आघाडीवर आहेत.

हेही वाचा - Bihar Election : इव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही का? काँग्रेस नेत्याचा सवाल
पुष्पम प्रिया यांच्यावर संपुर्ण देशाचेच लक्ष लागू राहीले आहे. कारण पुष्पम प्रिया या लंडनमधून उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वडील स्वत: जेडीयूमध्ये होते मात्र, त्यांनी स्वत:ची स्वतंत्र अशी पार्टी स्थापन करुन मैदानात त्या उतरल्या. त्या ज्यापद्धतीने बिहारच्या निवडणुकीत उतरल्या त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या  होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Result 2020 pushpam priya chaudhary lagged on both seats