डोनाल्ड ट्रम्प बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार नाहीत, तेजस्वी यादव यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

नितीशकुमार मागील 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर आहेत. परंतु, बिहाराला ते आतापर्यंत विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकले नाहीत.

पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता विविध पक्षांनी प्रचारात वेग घेतला आहे. आता जाहीरनामेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. आरजेडीच्या नेतृत्त्वाखाली महाआघाडीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करुन बिहारवासियांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी आपल्या जाहीरनाम्याला 'बदलाव के संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताच तेजस्वी यादव यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. 

बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार आहे. तेव्हाही नितीशकुमार बिहारला विशेष राज्याचा दर्जा देऊ शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला. ट्रम्प अमेरिकेतून येऊन बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. 

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकर आहे. नितीशकुमार मागील 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर आहेत. परंतु, बिहाराला ते आतापर्यंत विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकले नाहीत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प येणार नाहीत. 

हेही वाचा- Bihar Election : 'प्रण हमारा संकल्प बदलाव का'; तेजस्वी यादवांनी तरुणांना दाखवली मोठी स्वप्ने

दरम्यान, 'प्रण हमारा संकल्प बदलाव का' अशा टॅगलाईनखाली या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. 'संकल्प पत्र' असं नाव दिल्या गेलेल्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष दिले गेले आहे. यामध्ये तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले आहे.

महाआघाडीद्वारे संकल्प पत्रात दिलेली आश्वासने
- कर्पूरी श्रम केंद्राची स्थापना केली जाईल
- शिक्षकांना समान काम समान वेतन दिले जाईल
- बिहटामध्ये विमानतळाची निर्मिती
- वीजेच्या निर्मीतीवर जोर
- शेतकऱ्यांची कर्जमाफी
- बेरोजगारी दूर करण्यावर विशेष भर
- 10 लाख युवकांना रोजगार
- बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी संघर्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Elections 2020 Tejashwi Yadav Nitish Kumar Bihar special category status Donald Trump