Bihar Election : 'प्रण हमारा संकल्प बदलाव का'; तेजस्वी यादवांनी तरुणांना दाखवली मोठी स्वप्ने

Bihar RJD manifesto
Bihar RJD manifesto

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या जेडीयू-भाजप एनडीएला राजद-काँग्रेसच्या महाआघाडीने आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये गेली तब्बल 15 वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या नितीश कुमारांना एँटी-इन्कम्बसीचा सामना करत पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्याचे आव्हान असणार आहे तर कोरोना प्रादुर्भाव, मजूरांचे स्थलांतर आणि बिहार महापूर अशा समस्यांना लोकांसमोर ठेवत विरोधकांना नितीश कुमारांना सत्तेतून पायउतार करायचे आहे. यासाठीच महाआघाडीने एनडीएविरोधात दंड थोपटून आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पाटणा शहरातील मौर्या हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीतील इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

'प्रण हमारा संकल्प बदलाव का' अशा टॅगलाईनखाली या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. 'संकल्प पत्र' असं नाव दिल्या गेलेल्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष दिले गेले आहे. यामध्ये तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. याआधी काल शुक्रवारी रात्रीच राजदकडून अशी माहिती दिली गेली होती की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीतर्फे संयुक्त जाहीरनाम्याची प्रसिद्धी शनिवारी होऊ शकते. राजदसहित इतर घटकपक्षांची एक विशेष समिती यासंदर्भात सलग दोन दिवस यावर विचार करत होती. 

या संकल्प पत्राच्या प्रकाशनानंतर महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यांनी नवरात्रीनिमित्त बिहारवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आपण आज घटाची स्थापना करतो. आम्हीदेखील घरी घटस्थापना केली आहे आणि संकल्पही केला आहे. 'प्रण हमारा संकल्प बदलाव का' हा आमचा बदलाचा संकल्प सत्यात उतरणार आहे. आम्ही संकल्प केला आहे की, आमचं सरकार स्थापन झाल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तरुणांना 10 लाख रोजगार देण्याचा निर्णय घेणार आहोत. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवालासहीत महाआघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. 

तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, बिहार मध्ये डबल इंजिन सरकार असून गेल्या 15 वर्षांत राज्य करुनही बिहारला विशेष राज्याचा दर्जा अद्याप मिळवून देऊ शकले नाहीयत. त्यांनी याचा संदर्भ देत नितीश कुमारांना टोला हाणत म्हटलं की, बिहारला हा दर्जा मिळवून द्यायला डोनाल्ड ट्रम्प तर अमेरिकेहून येणार नाहीयेत. 

महाआघाडीद्वारे संकल्प पत्रात दिलेली आश्वासने
- कर्पूरी श्रम केंद्राची स्थापना केली जाईल
- शिक्षकांना समान काम समान वेतन दिले जाईल
- बिहटामध्ये विमानतळाची निर्मिती
- वीजेच्या निर्मीतीवर जोर
- शेतकऱ्यांची कर्जमाफी
- बेरोजगारी दूर करण्यावर विशेष भर
- 10 लाख युवकांना रोजगार
- बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी संघर्ष

बिहार विधानसभेच्या निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहेत. यातील दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत काल संपुष्टात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 1062 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी आतापर्यंत 63 उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com