तेजस्वी यादव यांना विजयाचा विश्वास! कार्यकर्त्यांसाठी जारी केल्या सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

बिहार निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा शनिवारी संपल्यावर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल समोर यायला सुरुवात झाली.

पाटणा- बिहार निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा शनिवारी संपल्यावर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल समोर यायला सुरुवात झाली. संपूर्ण निवडणूक काळात ‘माहोल’ करणाऱ्या तेजस्वी यादव यांचा बोलबाला या आकडेवारीतही पाहायला मिळत आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस जादुई आकडा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आरजेडीने आपल्या कार्यकर्त्यांना निकालादिवशी संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रीय जनता दलने (राजद) आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, राजदच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की, 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल काहीही लागो, कार्यकर्त्यांनी संयम, शिष्टाचार बाळगावा आणि निकाल साधेपणाने स्वीकारावा. अनुचित फटाकेबाजी, फायरिंग, विरोधक किंवा त्यांच्या समर्थकांसोबत अयोग्य व्यवहार कोणत्याही परिस्थिती सहन केला जाणार नाही. 

अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस; बायकोही सोडणार साथ!

तेजस्वी यादव यांनी निवडणुकीदरम्यान प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी २१ दिवसांच्या प्रचार कालावधीत एकट्याने २५१ सभा घेतल्या. ही सरासरी १२ च्या आसपास आहे. तेजस्वी यांच्या मेहनतीपणाची जोरदार चर्चा झाली. बेरोजगारीचा आलेख तेजस्वी यांनी अचूकपणे हेरला आणि हाच मुद्दा तेजस्वी यांनी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणला. ‘आमचे सरकार आल्यावर लगेचच १० लाख सरकारी नोकऱ्या देऊ', अशी घोषणा तेजस्वी यांनी केली. नोकऱ्या कशा देणार? असा उलट प्रश्न तेजस्वी यांना विचारणाऱ्या जेडीयू आणि भाजपने १९ लाख नोकऱ्यांची घोषणा केली.

भ्रष्ट्राचार प्रकरणात शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या चेहऱ्याचा वापर निवडणूक प्रचारात कुठेही करायचा नाही, असे नियोजन करताना केवळ तेजस्वी यांचाच चेहरा पुढे केला गेला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एनडीए ‘जंगलराज’चा मुद्दा पुढे करुन कोंडीत करायचा प्रयत्न करेल. तसा प्रयत्न झालाही, मात्र त्याची तरुण मतदारांनी फारशी दखल घेतली नाही. तेजस्वी यांनीही आई-वडिलांचे चेहरे न वापरता त्यांचे ‘केडर’ वापरून ही लढाई शेवटाला नेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar elelction rjd instruction to workers after exit polls