महिन्याभरातच बिहार आघाडी सरकारमध्ये धुसफूस; 'लव्ह जिहाद' ठरतोय वादाचा मुद्दा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 December 2020

बड्या भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात केलेल्या कायद्यांमुळे भाजप आणि बिहारमधील त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

पाटणा- बड्या भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात केलेल्या कायद्यांमुळे भाजप आणि बिहारमधील त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशा प्रकारचे कायदे हे लोकशाहीसाठी प्रतिकूल ठरू शकतात, असे मत ‘जेडीयू’कडून मांडण्यात आले आहे. जेडीयूच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये लव्ह जिहादविरोधातील कायदे आणि अरुणाचल प्रदेशातील सात आमदारांच्या बंडखोरीचा विषय चर्चिला गेला. 

न्यूमोनियावर आली पहिली स्वदेशी लस; सिरमच्या 'न्यूमोसिल'चे...

पक्षाचे सरचिटणीस के.सी.त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘‘लव्ह जिहादच्या नावाखाली तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोणत्याही महिला आणि पुरुषाने परस्पर संमतीने ठेवलेले संबंध हे नैतिकच असतात. डॉ. लोहिया यांचे देखील हेच म्हणणे होते. आमच्या पक्षाची देखील हीच भूमिका आहे. अरुणाचल प्रदेशात आमच्या पक्षाच्या आमदारांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे असे म्हणता येणार नाही.’’ 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी घेतलेली भूमिका देखील योग्य नव्हती. निवडणुकीच्या काळामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत आमच्याविरोधात लढत होते. अशास्थितीमध्ये भाजपने त्यांना रोखायला हवे होते. आताही आमचा पक्ष प.बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.

टपाल तिकिटावर चक्क अंडरवर्ल्ड डॉनचा फोटो, टपाल विभागाचा भोंगळ कारभार

गृहविभागासाठी मंत्र्याची मागणी

भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आणि माजी केंद्रीयमंत्री संजय पासवान यांनी राज्यामध्ये गृहविभागासाठी वेगळा मंत्रीच नेमण्याची मागणी केली आहे. सध्या या विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पासवान यांनीच गृहसचिव अमीर सुभानी यांना हटविण्याची मागणी केली होती.

जनता दल यूनायटेडच्या (JDU) राष्ट्रीय अध्यक्षपदी रामचंद्र प्रसाद सिंह (RCP Singh)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आरसीपी सिंह राज्यसभा खासदार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचे सर्वांनी समर्थन केले. अध्यक्ष पद सोडून नितीश कुमार यांनी मोठी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. आरसीपी सिंह दोन वेळेस राज्यसभा खासदार आहेत. ते 2010 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 2016 मध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar jdu bjp nitish kumar love jihad law