लालू प्रसाद यांच्यावर दिल्लीत ‘एम्स’मध्ये उपचार

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं रिम्समध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांनी दिल्लीला एम्समध्ये हलवण्याची तयारी करण्यात येत आहे. 

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना न्यूमोनियाचे निदान झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रांचीहून हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शनिवारी हलविले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

लालू प्रसाद यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला असून श्‍वास घेण्यास अडथळा येत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी चांगल्या उपचारांची गरज असल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये पाठविण्याची शिफारस रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाने केली होती. लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावल्याचे समजल्याने त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुले तेजस्वी व तेजप्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती हे ‘रिम्स’मध्ये पोचले. ‘वडिलांची प्रकृती ठीक असून चांगल्या उपचारांसाठी त्यांना दिल्लीला नेत असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले. लालू प्रसाद यांच्यासाठी ‘रिम्स’पासून बिरसा मुंडा विमानतळापर्यंत `ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला होता.

हे वाचा - शेतकरी नेत्यांचा हत्त्येचा कट ते उध्दव ठाकरे-राज ठाकरे पुन्हा एकत्र; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

‘‘लालू प्रसाद यांनी चांगल्या उपचारांची गरज असून त्यांना जामीन देण्याची मागणी राबडी देवी यांनी केली. केंद्राच्या आडमुठेपणामुळे त्यांना जामीन मंजूर केला जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. लालू यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. लालूंचे शेकडे समर्थक बिहारमधून झारखंडला पोचले होते.

दरम्यान, राबडी देवी या मुलगी मीसा भारतीसोबत आज पुन्हा रिम्समध्ये पोहोचल्या होत्या. दोघींनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. याआधी शुक्रवारी रात्री घेतलेल्या भेटीनंतर राबडी देवी भावूक झाल्या होत्या. लालू यादव यांनी त्यांना सांगितलं होतं की, मी लवकरच बरा होईन. यावेळी मीसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar lalu prasad yadav health critical health update riims ranchi AIIMS delhi