एकाच वेळी तीन ठिकाणी सरकारी नोकरी; ती पण 30 वर्षे

suresh ram
suresh ram

पाटणाः देशभरात बेरोजगारीची लाट सुरू असताना अनेक उच्चशिक्षित बेरोजगार आहेत. सध्या सरकारी नोकरी सोडा पण खासगी कंपनीमध्येही नोकरी मिळणे अवघड झाले आहे. परंतु, बिहारमधील एक व्यक्ती चक्क एकाच वेळी तीन ठिकाणी तब्बल 30 वर्षे नोकरी करत होती. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर अटकेच्या भितीने संबंधित व्यक्ती फरार झाली आहे.

सुरेश राम असे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बभौल गावात राहणारा सुरेश हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून तीन वेगवेगळ्या सरकारी पदांवर कार्यरत होता. विशेष म्हणजे तीस वर्षांपासून त्यांना तीन नोकऱ्यांचा पगार मिळत आहे. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्या नंतर सुरेशला एकाच वेळी तीन नोकऱ्या मिळाल्या कशा? याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किशनगंजमध्ये बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता, बंका तालुक्यातील बेल्हार प्रकल्पामध्ये जलंसंधारण सहाय्यक अभियंता, भीमनगर पूर्व येथील जलसंधारण सहाय्यक अभियंता या तीन पदांवर सुरेश एकाच वेळी काम करत होता.

सुरेशची पहिली नोकरी म्हणजे 20 फेब्रुवारी 1988 रोजी पाटण्यातील सार्वजिनिक आणि रस्ते बांधाकाम विभागातील. कनिष्ठ अभियंतापदावर तो रुजू झाला होता. या विभागामध्ये एक वर्ष काम केल्यानंतर 28 जुलै 1989 रोजी त्याला जलसंधारण विभागातून नोकरीची ऑफर आली. सुरेशने आहे त्या नोकरीचा राजीनामा न देता ही ऑफर स्वीकारली. एकाच वेळेस दोन नोकऱ्या करत असतानाच जलसंधारण विभागानेच त्याला तिसऱ्या नोकरीची ऑफर दिली. पण, सुरेशने पहिल्या नोकऱयांबाबत विभागाला न कळवता तिसरीही नोकरी स्वीकारली.

बिहारमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी सीएफएमएस ही नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सुरेश प्रकरण उघड झाले आहे. पगारासाठी या यंत्रणेमध्ये कर्मचाऱ्याचा आधारकार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक असते. या अटीमुळे सुरेशचे प्रकरण पुढे आले. काही वर्षांमध्ये सुरेश एकाच वेळी या तिन्ही नोकऱ्यांमधून निवृत्त होणार होता. मात्र, नवीन यंत्रणेमुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे. सुरेश ज्या-ज्या ठिकाणी काम करत होता, त्या तिन्ही पोलिस स्थानकांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरेश सध्या फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com