बिहार, आसाममध्ये महापुराने हाहाकार

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मृतांच्या संख्येत वाढ, जनजीवन विस्कळित

पाटणा- बिहार तसेच आसाममध्ये महापुराने हाहाकार उडाला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. बिहारमधील पुरातील मृतांची संख्या साठवर पोचली आहे. कालपर्यंत पुराने 41 जणांचा बळी घेतला होता. त्यात आता वाढ झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पूरग्रस्त भागाचा पुन्हा दौरा करून पाहणी केली. राज्यात महापुराने 80 लाख लोकांना फटका बसला आहे. कोसी नदीच्या क्षेत्रातील सीमेपलीकडील भाग तसेच चंपारण्यला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.

अररिया व पश्‍चिमी चंपारण्य जिल्ह्यात महापुराने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. केवळ या दोन जिल्ह्यांत चाळीस जणांचा बळी गेला आहे. पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यात गेलेल्या वीस मृतांची माहिती तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनाही नाही, अशी परिस्थिती आहे. येथील गौनाहा गावात वीस जण पुरात वाहून गेले. त्यातील दहा जणांचे मृतदेह मिळाले असून, उर्वरित बेपत्ता आहेत. येथील पंडई नदीच्या प्रवाहात किमान तीस घरे वाहून गेली आहेत. मदत व बचावकार्यासाठी "एनडीआरएफ'ची दले अहोरात्र काम करीत आहेत.

आसामातही परिस्थिती गंभीर
आसामातही पुराने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात आज आणखी दहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 28 झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. ब्रह्मपुत्रा तसेच तिच्या सर्व उपनद्या सध्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असल्याने राज्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील 32 पैकी 25 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, 33 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रेल्वेच्या कटिहार, अलिपूरदूर विभागात अनेक ठिकाणी रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, आज पश्‍चिम बंगालमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने राज्याच्या उत्तर भागातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. पुराचा फटका बसलेल्या जलपैगुडी, अलिपूरदर जिल्ह्यांतील परिस्थितीत सुधारणा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नावेतच बालिकेचा जन्म
मधुबनी जिल्ह्यातील पूरप्रभावित कहरारा गावातील रहिवासी बिलाल अहमद यांची गर्भवती पत्नी हरजाना खातून यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी "एनडीआरएफ'चे पथक आज दाखल झाले. परिवारासमवेत त्या नावेत बसताच त्यांना प्रसववेदना होऊ लागल्या. "एनडीआरएफ'च्या प्रथमोपचार करणाऱ्या प्रशिक्षित पथकाने परिस्थिती कुशलतेने हाताळली. "एनडीआरएफ'च्या नावेतच या महिलेने एका मुलीला जन्म दिला. नंतर त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आई व मुलीची प्रकृती उत्तम आहे.

Web Title: bihar news bihar and aasam flood and rain