बिहारचे भाजप मंत्री पत्रकारांवर बरसले

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

भारतमातेच्या जयघोषावरून वादग्रस्त विधान

पाटणा: "भारतमाता की जय' अशी घोषणा न दिल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बिहारचे भाजपचे मंत्री विनोदकुमार सिंह यांनी जाब विचारीत, "तुम्ही पाकिस्तानी आहात का' असे विचारून वाद ओढवून घेतला. मात्र, भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताच विनोदकुमार यांनी माफी मागितली. "मी चुकून असे बोललो', असा खुलासा सिंह यांनी बुधवारी केला.

विनोदकुमार सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळात खाण व भूगर्भशास्त्र मंत्रालयाची जबाबदारी आहे. भाजपने मंगळवारी (ता. 8) आयोजित केलेल्या "संकल्प संमेलना'त विनोदकुमार सिंह यांनी उपस्थितांना "भारतमाता की जय' ही घोषणा देण्याचे आवाहन केले होते. पण, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घोषणा देत नसल्याचे निदर्शनास आल्यावर, "तुम्ही पाकिस्तानची मुले किंवा मुली आहात का?' असा प्रश्‍न केला. ""आपण सर्वजण प्रथम भारताची मुले आहोत, नंतर पत्रकार आहोत,'' असे त्यांनी सुनावले. भाजपच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय व अन्य मंत्री उपस्थित होते.

मंत्र्यांच्या या विधानावर राय यांनी नाराजी व्यक्त करताच कार्यक्रम संपण्यापूर्वी सिंह यांनी पत्रकारांची माफी मागितली. याविषयी बोलताना सिंह म्हणाले, ""भावनेच्या भरात मी हे कृत्य केले. मला कोणाविषयी आकस नाही. जोशात असल्याने माझ्याकडून चुकून पत्रकारांविषयी असे बोलले गेले. पण, त्यामुळे माझ्या पत्रकार बंधू- भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास, मी त्यांची हृदयापासून माफी मागतो.''

Web Title: bihar news bjp minister and journalist