नितीशकुमार यांनी 'ठराव' जिंकला; पण "विश्‍वास' गमावला

nitishkumar
nitishkumar

पाटणा : बिहारच्या राजकारणातील कठोर प्रशासक आणि तितकेच मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीशकुमार यांनी विधिमंडळातील विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरीसुद्धा एक संधिसाधू राजकारणी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षांत तीन सरकारे स्थापन झाली आणि ती पडलीही. नितीश हे 2013 मध्ये "एनडीए'तून बाहेर पडले आणि त्यांनी लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी केली. यानंतर नितीश यांनी भाजपवर केलेली बोचरी टीका लोक अद्याप विसरलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी नितीश यांनी मातीमोल होऊ; पण भाजपशी कदापि हातमिळवणी करणार नाही, असे विधान केले होते. संघमुक्त भारत आणि मध्य प्रदेशातील "व्यापमं' गैरव्यवहारावरून त्यांनी कमळाच्या पाकळ्या तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता तेच नितीश भाजपचे मित्र झाल्याने लोकांना हरियानाचे राजकारण आठवू लागले आहे. कधीकाळी हरियानामध्येही भजनलाल यांनी जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसशी मैत्री केली होती. भविष्यामध्ये नितीश यांना आपल्या प्रतिमेची विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. बिहारी "डीएनए'मध्येच दोष असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात आक्रमक टीकास्त्रे डागणाऱ्या नितीश यांनी अचानक "एनडीए'ला जवळ केल्याने विरोधकांचा मात्र अवसानघात झाला आहे.

भ्रष्टाचाराशी हातमिळवणी
पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी लालूंना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे हे माहिती असतानाही नितीश यांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्याशी हातमिळवणी केली होती. नितीश यांना एवढेच तत्त्वांचे राजकारण प्यारे होते तर त्यांनी लालूंसोबत मैत्री का केली, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे. 2015 मध्ये नितीश यांना एकटेपणानेही निवडणूक लढणे शक्‍य होते; पण त्यांनी तो धोका टाळला. याआधीही 2013 मध्ये "एनडीए'मधून बाहेर पडल्यानंतरदेखील नितीश यांनी सरकार चालविण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाच्या 22, कॉंग्रेसच्या 9 आमदारांची मदत घेतली होती. त्या वेळेस त्यांना भ्रष्टाचाराचा मुद्दा तितकासा महत्त्वाचा वाटला नव्हता.

भाजपला आयते घबाड
नितीश यांनी यू-टर्न घेतल्याने भाजपला मात्र लॉटरी लागली आहे, विद्यमान उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नितीश यांना धोकेबाज ठरवत त्यांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये मोदींनी म्हटले होते की, "1994 मध्ये आपण लालूप्रसाद यादव यांना धोका दिला, जॉर्ज फर्नांडिस यांना फसवत आता भाजपलाही तुम्ही धोका देत आहात.'' विशेष म्हणजे नितीश यांनी या पत्राबाबत माध्यमांशी बोलणे टाळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com