बिहारमधील पेपरफुटीचे 'राजकीय कनेक्‍शन' उघड

उज्ज्वलकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

या गैरव्यवहारामध्ये राजकीय नेतेमंडळींचा सहभाग असल्याने "एसआयटी' याची निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. या गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माध्यमातूनच चौकशी केली जावी.
- सुशीलकुमार मोदी, भाजप नेते

आमदार, खासदार, मंत्र्यांची आपल्या उमेदवारांसाठी वशिलेबाजी

पाटणा: बिहारमधील कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेचे "राजकीय कनेक्‍शन' उघड झाले असून, बिहारमधील आमदार, खासदार आणि नितीशकुमार सरकारमधील काही मंत्र्यांनीदेखील आपल्या उमेदवारांसाठी वशिला लावल्याचे दिसून आले. विशेष तपास पथकाने आयोगाचे सचिव परमेश्‍वर राम यांची चौकशी केली असता त्यातून ही बाब उघड झाली आहे.

बारावीच्या धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यासाठी विशेष तपास पथकदेखील स्थापन करण्यात आले होते. आयोगाकडून चार टप्प्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतील सावळा गोंधळ उघड झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे परीक्षा होण्याआधीच काही तास आधी पेपरफुटीचा प्रकार उघड झाला होता. आयोगाने जरी या गोष्टीचा इन्कार केला असला तरीसुद्धा सत्य मात्र वेगळे आहे. आता पोलिसांनी आयोगाच्या सचिवांनाच ताब्यात घेतले असून, त्यांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या पेपरफुटीचा तपास करणाऱ्या समितीने आयोगाचे अध्यक्ष सुधीरकुमार यांची चौकशी केली आहे. गरज भासल्यास त्यांची आणखी चौकशी केली जाऊ शकते.

लालकेश्‍वर, परमेश्‍वर कनेक्‍शन
टॉपर गैरव्यवहारात लालकेश्‍वर यांना पहिल्यांदाच अटक करण्यात आली असून सध्या ते तुरुगांत आहेत. काही अधिकारी तर "टॉप कराएगा लालकेश्‍वर, नौकरी दिलाएगा परमेश्‍वर' हे सूत्र शिक्षणक्षेत्रात रूढ झाल्याचे सांगतात. टॉपर गैरव्यवहाराचे सूत्रधार बच्चा यांचे सर्व राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ठ अर्थपूर्ण संबंध चर्चेचा विषय ठरले आहेत.

बड्या नेत्यांची नावे उघड
परमेश्‍वर राम यांची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी काही बड्या नेत्यांची नावे उघड केली आहेत. आपण या गैरव्यवहारामध्ये केवळ प्यादे असून, खरे खिलाडी हे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी आधी मुख्य सूत्रधारांना अटक करावी, असेही त्यांनी म्हटले असून त्यांच्या कबुलीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Bihar peper leak 'political connections' exposed