कोरोनावरील संशोधन आणि उत्पादनात भारताची कामगिरी प्रेरणादायी- बिल गेट्स

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

यापूर्वीही अनेकवेळा बिल गेट्स यांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली- प्रख्यात उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी भारताच्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारताचे संशोधन आणि उत्पादनाची क्षमता कोरोनाविरोधातील लढाईसाठी खूप महत्त्वाची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रँड चॅलेंजस एन्युएल मीटिंग 2020 कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचे टि्वट रिट्विट करत या कार्यक्रमात आपल्याला सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

यापूर्वीही अनेकवेळा बिल गेट्स यांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. जगातील सर्वात मोठ्या वैद्यकीय उत्पादकांच्या देशात भारताचाही समावेश आहे. त्याचबरोबर लस निर्मितीची सर्वाधिक क्षमता ही भारताची आहे. 

त्यामुळेच सध्या भारतात देशी कोविड लस व्यतिरिक्त ऑक्सफर्डमधील लस आणि रशियातही लशीची चाचणी सुरु आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भारतात त्याचे उत्पादन वाढवता येईल आणि संपूर्ण देशात त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. 

हेही वाचा- चीनला इशाराः मलबार नौदल युद्ध सरावात भारताबरोबर ऑस्ट्रेलियाही सहभागी होणार

गेट्स यांनी म्हटले की, आता कोविड-19 चा सामना करण्यासाठी विशेषतः मोठ्याप्रमाणावर लस निर्मिती करण्यात भारताची संशोधन आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका असेल. हा विषाणू शोधण्यासाठी नाविन्यतेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. 

हेही वाचा- देशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रँड चॅलेंजस एन्युएल मीटिंग 2020 मध्ये बोलताना जगातील अनेक क्षेत्रात होत असलेल्या संशोधनात भारताच्या भूमिकेबाबत भाष्य केले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bill gates praise India corona vaccine research manufacturing