चीनला इशाराः मलबार नौदल युद्ध सरावात भारताबरोबर ऑस्ट्रेलियाही सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

भारत आणि अमेरिका यांच्यात मंत्रिस्तरावर खास लष्करी करारासाठी 2+2 बैठक होणार असल्याने चीनचा आणखी जळफळाट होणार आहे.

नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर (एलएसी) प्रचंड तणावाची स्थिती आहे. दक्षिण चीन समुद्रातही हालचाली वाढल्या आहेत. याचदरम्यान, चीनला स्पष्ट संदेश देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल एकत्र येणार आहेत. पुढील महिन्यात मलबार युद्ध अभ्यास सरावात या चार देशांच्या सहभागामुळे चीनचा तीळपापड होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यात मंत्रिस्तरावर खास लष्करी करारासाठी 2+2 बैठक होणार असल्याने चीनचा आणखी जळफळाट होणार आहे. दोन्ही देशातील संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही बैठक 26-27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

ऑस्ट्रेलियन नौदल मलबार युद्ध सरावात भाग घेणार असल्याची घोषणा भारताने सोमवारी केली. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या युद्ध सरावात एकूण चार देश सहभागी होणार आहेत. त्यांना क्वाड असेही म्हणतात. सन 2017 मध्ये या सरावास पुन्हा प्रारंभ झाला. यात भारत, अमेरिका आणि जपान सामील होतात. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जपानच्या समुद्र किनारपट्टीवर जबरदस्त युद्ध सराव झाला होता. 

हेही वाचा- कृषी विधेयकाची प्रत न मिळाल्यामुळे आप आमदारांनी विधानसभेत घालवली रात्र

याच महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्या महत्त्वाची बैठक होणार आहे. दि. 26-27 ऑक्टोबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे समकक्ष माइक पॉम्पिओ यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीत बेसिक एक्सचेंज अँड को-ऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट लाँग रेंज नेव्हिगेशन (बीईसीए) आणि मिसाईल टारगेटिंगसाठी भारताला अडव्हान्सड सॅटेलाइट आणि टोपोग्राफिकल डेटा उपलब्ध करण्याबाबत करार होणार आहे. 

हेही वाचा- 'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia will join its annual Malabar naval exercise with us japan says India china