New Delhi News : पुढील शतकात एक अब्ज अकाली मृत्यूची शक्यता; संशोधकांचा अंदाज

जगभरात हवामान बदलाचे भीषण परिणाम पूर, अतिवृष्टी, दुष्काळ आदींमधून जाणवू लागले आहेत.
Temperature
TemperatureSakal

नवी दिल्ली - जगभरात हवामान बदलाचे भीषण परिणाम पूर, अतिवृष्टी, दुष्काळ आदींमधून जाणवू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास मानवनिर्मित कारणांमुळे होणारा हवामान बदल पुढील शतकात सुमारे एक अब्ज अकाली मृत्यूंना कारणीभूत ठरण्याची भीती संशोधकांनी वर्तविली आहे. ‘एनर्जीस’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे.

या नियतकालिकात कार्बन उत्सर्जन तातडीने व लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी ऊर्जा धोरण गांभीर्याने राबविण्याचीही सूचना केली आहे. पुढील शतकात मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे एक अब्ज अकाली मृत्यू होण्याची शक्यता आहे.

मृत्यूचा हा आकडा कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकार, संस्था तसेच नागरिकांच्या स्तरावर सक्रियतेला चालना देण्याची गरजही या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. संशोधकांच्या मते, जवळपास एक हजार टन जीवाश्म कार्बनचे ज्वलन भविष्यातील एक अकाली मृत्यूला कारणीभूत ठरण्याचा अंदाज आहे. हा एक हजार टनांचा नियम म्हणून ओळखला जातो.

कॅनडातील वेस्टर्न ओंटारिओ विद्यापीठाचे प्रा. जोशुआ पीअर्स म्हणाले, ‘‘जर या एक हजार टनांच्या नियमाचे वैज्ञानिक दुष्परिणाम गांभीर्याने लक्षात घेतले आणि आकडेवारी काढली तर ती पुढील शतकात मानवनिर्मित हवामान बदलांमुळे सुमारे एक अब्ज मृत्यू होण्याचा अंदाज काढता येतो.

त्यामुळे, आता आपल्याला लवकरात लवकर कृती करावीच लागेल.’ जागतिक तापमानवाढ समजून घेऊन अधिकाधिक धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील नेते जगाचे जीवाश्म इंधनावरील अवंलबित्वाबाबतचे कटू सत्य समजून घेतील, अशी आशाही पीअर्स यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, ‘स्पष्टपणे सांगायचे तर भविष्याचा अंदाज वर्तविणे अवघड आहे. मात्र, हवामान मॉडेल्सचे अंदाज जसजसे स्पष्ट होत जातील, तसे मुलांचे आणि भावी पिढ्यांचे हवामान बदलाला चालना देणाऱ्या आपल्या कृतीमधून कसे नुकसान करतो आहोत, हे लक्षात येत जाईल. एकदा का हा प्रत्यक्ष सहसंबंध ओळखता आला की हरितगृह वायूच्या जबाबदारीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करता येणार नाही.’

तेल, वायू उद्योगामुळे कार्बन उत्सर्जन

जगभरात तेल व वायू उद्योग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ४० टक्के कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत असून त्याचा अब्जावधी लोकांवर परिणाम होत आहे. यापैकी बहुतेकजण जगाच्या दुर्गम भागातील किंवा कमी साधनसंपत्ती असणाऱ्या समुदायातील आहेत.

जागतिक तापमानवाढ समजून घेऊन अधिकाधिक धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील नेते जगाचे जीवाश्म इंधनावरील अवंलबित्वाबाबतचे कटू सत्य समजून घेतील. अनमोल मानवी जीवन वाचविण्यासाठी आपण जीवाश्म इंधनाचे ज्वलन शक्य तेवढ्या लवकर थांबवायला हवे. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय्य ऊर्जेबाबत अधिक आक्रमक दृष्टिकोनही स्वीकारायला हवा.

- प्रा. जोशुआ पीअर्स, संशोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com