esakal | आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

BPF

आसाममध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका लागला आहे.

आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुवाहाटी : आसाममध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका लागला आहे. आासमामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारमध्ये गेल्या 5 वर्षांपासून प्रमुख सहकारी असणाऱ्या बोडोलँड पीपल्स फ्रंट (BPF) ने आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटचा हा निर्णय म्हणजे भाजपला आसाममध्ये बसलेला मोठा धक्का मानला जातोय. आसाममधील बोडोलँड बेल्टमध्ये आपली पकड मजबूत असणाऱ्या BPF ने 2006 सालापासूनच बोडोलँडच्या सर्व 12 जागा जिंकल्या आहेत. BPF चे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी ट्विट करत म्हटलंय की, शांती, एकता आणि विकासासाठी काम करण्यासाठी BPF ने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 'महाजाथ'सोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपासोबत आता आमची युती अथवा मैत्री नसेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. 

आसाममध्ये भाजपा आणि BPF च्या नात्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. काही मुद्यांवर मतभेद होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काउंसिलच्या निवडणुकीत भाजपाने BPF ला सोबत घेतलं नव्हतं. त्या निवडणुकीत BPF ला 17, भाजपाला 9, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) ला 12 जागा मिळाल्या होत्या. 

हेही वाचा - गॅस सिलिंडर किंमती ते नवीन एटीएम व्यवहार नियम; 1 मार्चपासून बदलणाऱ्या 5 गोष्टी

BPF ची सोबत मिळाल्यामुळे आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सहा पक्षांच्या आघाडीचा विस्तार झाला आहे. या आघाडीमध्ये बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि राष्ट्रीय जनता दल देखील सामील झाले आहेत. याआधी AIUDF, CPI, CPM, CPI (M-L) आणि आंचलिक गण मोर्चा हे पक्षा समाविष्ट आहेत. आसाम विधानसभेमध्ये 126 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठी 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 मे रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील. सध्या आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 60 जागांवर विजय मिळाला होता.