मोदींची प्रतिमा जाळल्याने भाजप संतापला

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

भारतीय राजकारणाची पातळी काँग्रेसने कधी नव्हे इतक्‍या खालच्या पातळीला आणून ठेवली, अशी टीका केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "सकाळ' शी बोलताना केली. 

नवी दिल्ली - कृषी कायद्यांना तीव्र विरोध होणाऱ्या पंजाबमध्ये दसऱ्यानिमित्त रविवारी (ता. २५) अनेक ठिकाणी रावण दहनावेळी दशानन रावणाच्या पुतळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे चढविल्याच्या प्रकाराने भाजप संतप्त झाला आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी , हे राहुल गांधी दिग्दर्शित व निर्देशित निर्लज्जपणाचे नाटक होते, असा हल्ला चढविला. भारतीय राजकारणाची पातळी काँग्रेसने कधी नव्हे इतक्‍या खालच्या पातळीला आणून ठेवली, अशी टीका केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "सकाळ' शी बोलताना केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबमधील प्रकारावर नड्डा यांनी ट्‌विट करताना म्हटले, की ही घटना लाजीरवाणी असली तरी निराशेची टोकाची पातळी गाठलेल्या कॉंग्रेसच्या बाबतीत ती अनपेक्षित नाही. व राहुल गांधींकडून तीच अपेक्षा आहे. नेहरू-गांधी घराण्याने त्यांच्या घराबाहेरील पंतप्रधानाचा कधीही सन्मान ठेवला नाही हे पुन्हा दिसून आले. २००४-२०१४ मध्ये तेच दिसले. आता कॉंग्रेसमध्ये निराशा, हताशा व निर्लज्जपणा या दोन्हींचे घातक मिश्रण वारंवार दिसून येते. एकीकडे पक्षाचे नेतृत्व असलेल्या आईकडून (सोनिया गांधी) सभ्यता व लोकशाहीची फुसकी वक्तव्ये दिली जातात तर दुसरीकडे मुलगा असत्य, द्वेष, संताप व खोटी आक्रमकता यांचे रोजच्या रोज दर्शन घडवीत आहे. राहुल गांधी भारताचे प्रतिनिधित्व करतात का पाकिस्तानचे हेही अनेकदा समजत नाही. 

हेही वाचा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी उद्या मतदान

पक्ष व्हेंटिलेटरवर; अहंकार एक्सेलेटरवर 
कॉंग्रेस पक्ष आज व्हेंटिलेटरवर असला तरी या पक्षाचा व घराण्याचा अहंकार एक्‍सेलेटवर आहे, असा हल्ला अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी चढविला. ते म्हणाले की कॉंग्रेसने चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आदी पंतप्रधानांचाही मोठा अपमान केला. श्रीमती गांधी यांच्या ताज्या लेखावरून, हा पक्ष भारताच्या नव्हे तर भारतविरोधी व देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांच्याच बाजूने असल्याचे दिसते. मोदी सरकारने नव्हे तर कॉंग्रेसनेच तपास संस्थांचा सर्वोच्च दुरुपयोग केल्याचा इतिहास आहे, असे त्यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP angry over burning of Narendra Modi statues