आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपचाच हात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

आयएमए ज्वेलर्स गैरव्यवहार प्रकरणात एक आमदार सामील असल्याचे या गैरव्यवहारातील सूत्रधारानेच जाहीर केले आहे. या आमदारानेही आता राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याचे उघड वक्तव्य केले आहे.

बंगळूर : विश्वासदर्शक ठरावावर मतदानास विलंब केल्यास अनैतिकता ठरते; मग आमदारांना पळवून नेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे नैतिकता आहे का, असा प्रश्न ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी केला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. 

ते म्हणाले, ''विरोधी पक्ष व प्रसारमाध्यमे विश्वासदर्शक ठरावावर बोलत आहेत, लिहीत आहेत. परंतु, काही आमदारांनी राजीनामे दिले. त्यावर मात्र चर्चा केली जात नाही. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण काय, त्यांनी राजीनामा देण्यामागे कोणाचा हात आहे, यावरही चर्चा झाली पाहिजे. विश्वासदर्शक ठरावावर लवकर निर्णय व्हावा, अशी तुम्हाला घाई असेल. परंतु, या सर्व गोष्टी उघड व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे.'' 

काँग्रेसचे आमदार बी. सी. पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले. त्यांनी भाजपशी संपर्क साधून 25 कोटीच्या आमिषाच्या जाळ्यात अडकल्याचे समजते. आता त्यांनीही आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रसारमाध्यमांतून या गोष्टी जाहीर झाल्या आहेत, असे ते म्हणाले. 

आयएमए ज्वेलर्स गैरव्यवहार प्रकरणात एक आमदार सामील असल्याचे या गैरव्यवहारातील सूत्रधारानेच जाहीर केले आहे. या आमदारानेही आता राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याचे उघड वक्तव्य केले आहे. हे भाजपचे प्रोत्साहन नाही का, हीच भाजपची नैतिकता आहे का, असे प्रश्न बैरेगौडा यांनी उपस्थित केले. 

सभागृहात बिर्याणीची कथा 
कृष्णा बैरेगौडा यांनी सभागृहात आयएमए गैरव्यवहाराचा प्रश्न उपस्थित केला. या गैरव्यवहारात हजारो लोकांची फसवणूक झाली असल्याचा त्यांनी आरोप केला. या वेळी भाजपच्या सी. टी. रवी यांनी हस्तक्षेप करून यामागे कोणत्या सरकारचा हात आहे, ते सांगून टाका. आरोपी मन्सूर खान यांच्याबरोबर जाऊन कोणी बिर्याणी खाल्ली तेही सांगा, अशी मागणी केली.

त्यावर मध्येच उठून मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, ''मी बिर्याणी खाण्यासाठी गेलो नव्हतो. रमजानला बोलाविल्याने गेलो होतो. तेथे देण्यात आलेले खजूर मी खाल्ले. पण, त्याला बिर्याणी समजून व्हायरल करण्यात आले आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is behind the resignation of MLAs