भाजपलाही मराठीची कावीळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बेळगाव - काँग्रेस, धजदपाठोपाठ आता भाजपलाही मराठीची कावीळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विधान परिषदेत भाजप सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः सीमाभागातील गावांच्या मराठी नावांचे कानडीकरण करून त्यासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

बेळगाव - काँग्रेस, धजदपाठोपाठ आता भाजपलाही मराठीची कावीळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विधान परिषदेत भाजप सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः सीमाभागातील गावांच्या मराठी नावांचे कानडीकरण करून त्यासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

मध्यंतरानंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा सुरू असताना अचानकच भाजपच्या सदस्या डॉ. तेजस्विनी गौडा यांनी हा मुद्दा उकरून काढला. बेळगाव शहराचे नाव आपण बेळगावी असे केले आहे. त्यामुळे सीमाभागात कन्नडचे सबलीकरण झाले आहे. आता जिल्ह्यात विशेषतः सीमाभागातही कानडीचे प्राबल्य वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. सीमाभागातील गावांची मराठी नावे कानडी पद्धतीने बदलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी ज्या गावांच्या नावांचा शेवट ‘गाव’ने होतो, अशा गावांच्या नावात ‘बेळगावी’प्रमाणे ‘गावी’ असा बदल केला पाहिजे, अशी निरर्थक मागणी त्यांनी केली. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, महसूल विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे गौडा यांनी सांगितले. 

संसदीय व्यवहारमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी, यावर महसूल विभागाकडून माहिती घेऊन उत्तर देऊ, असे सांगून वेळ मारली. कर्नाटकात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी मराठी लोक आणि मराठी भाषा व संस्कृतीला त्यांच्यापासून धोका असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती तेजस्विनी गौडा यांच्या आजच्या अजब मागणीने झाल्याचे 
दिसून आले. 

कुमारस्वामी यांनी त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बेळगावच्या केएलईत विधिमंडळाचे पहिले अधिवेशन घेतले आणि व्हॅक्‍सिन डेपोत सुवर्णसौधचे भूमिपूजन केले. त्यानंतर भाजपचे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषिकांच्या खच्चीकरणासाठी हलगा येथे सुवर्णसौधचे भूमिपूजन केले. त्यानंतरचे भाजपचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी त्याचे उद्‌घाटन केले. काँग्रेसनेही सीमाभागातील मराठी भाषकांना दडपण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले आहेत. 

Web Title: BJP in Belgaum against Marathi