काँग्रेसचे उपोषण 10.30 ते 4.30; उपोषणापूर्वी नेत्यांचा ब्रेकफास्ट!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्यासाठी काँग्रेसने आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण आयोजित केले; पण या 'उपोषणा'पूर्वी नाश्‍ता करताना काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'हे सगळे ढोंग आहे' अशा शब्दांत भाजपने या उपोषणाची खिल्ली उडविली. 

नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्यासाठी काँग्रेसने आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण आयोजित केले; पण या 'उपोषणा'पूर्वी नाश्‍ता करताना काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'हे सगळे ढोंग आहे' अशा शब्दांत भाजपने या उपोषणाची खिल्ली उडविली. 

'हे उपोषण प्रतीकात्मक असल्यामुळे नेत्यांनी सकाळी 10.30 पूर्वी नाश्‍ता केला होता', अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. भाजपच्या विरोधात काँग्रेसने आज सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या कालावधीत लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे. 

भाजपचे नेते हरिश खुराना यांनी काँग्रेसच्या नेत्यांची नाश्‍ता करतानाची छायाचित्रे ट्‌विटरवर अपलोड केली. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन आणि अरविंदरसिंग लव्हली हेदेखील दिसत आहेत.

या मुद्यावरून काँग्रेसवर प्रचंड टीका सुरू झाल्यानंतर लव्हली यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'हे आमरण उपोषण नाही. फक्त प्रतीकात्मक उपोषण आहे' असे लव्हली यांनी सांगितले. 

'हे छायाचित्र आज सकाळी आठपूर्वीचे आहे. प्रतीकात्मक उपोषणाची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 अशी आहे. हे काही आमरण उपोषण नाही. भाजपच्या नेत्यांना काय झाले आहे, हे समजतच नाही! देश व्यवस्थित चालविण्याऐवजी आम्ही काय खात आहोत, याकडेच त्यांचे लक्ष आहे', असे लव्हली म्हणाले. 

विशेष म्हणजे, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी 12.45 च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. 'राहुलजी, तुमचे दुपारचे जेवण झाल्यावर उपोषणाला बसा', असा उपरोधिक सल्ला भाजपच्या अमित मालवीय यांनी दिला. 

दलितांसाठी हे उपोषण! 
देशातील दलितांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात सरकारविरोधात हे उपोषण करत आहोत, असे काँग्रेसने सांगितले. पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलतर्फे येत्या 23 एप्रिल रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे मेळावा होणार आहे.

या उपोषणाला सुरवात होण्यापूर्वीच काँग्रेसला अंतर्गत वादाला सामोरे जावे लागले होते. वादग्रस्त नेते जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना उपोषण स्थळावरून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. पण 'आम्ही कुणालाही बाहेर जाण्यास सांगितले नाही' असा खुलासा दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी केला. 

Web Title: BJP criticises Congress on Fast drama in Delhi