महिला अत्याचारांत भाजप खासदार आघाडीवर

पीटीआय
Tuesday, 10 December 2019

- एडीआर संस्थेचा दावा  

- काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर 

नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या खासदारांची संख्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सर्वाधिक आहे. भाजपच्या एकूण 21 खासदारांच्या विरोधात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या बाबतीत कॉंग्रेस (16) दुसऱ्या, तर वायएसआर कॉंग्रेस (7) तिसऱ्या क्रमांकावर आहे, असा दावा असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या संस्थेने केला आहे. त्यासाठी एडीआरने उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या लोकसभेतील खासदारांची संख्या 2009मध्ये दोन होती, ती 2019 मध्ये 19 वर पोचली आहे. तीन खासदार आणि सहा आमदारांच्या विरोधात बलात्काराचे गुन्हे आहेत. मागील पाच वर्षांत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी मागील पाच वर्षांत बलात्काराशी संबंधित गुन्हे असलेल्या 41 उमेदवारांना तिकिटे दिली होती, असे एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

मागील पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने लोकसभा, राज्यसभा आणि विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे असलेल्या 66 जणांना तिकीट दिले होते. तर कॉंग्रेसकडून 46 आणि बसपकडून 40 जणांना तिकिटांचे वाटप करण्यात आले होते. एडीआर आणि नॅशनल इलेक्‍शन वॉच यांनी संयुक्तपणे विद्यमान खासदार (759) आणि आमदारांनी (4,063) सादर केलेल्या एकूण 4,822 पैकी 4,896 प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला आहे.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या पाच वर्षांत 38 वरून 126 वर पोचली असून, ती 231 टक्‍क्‍यांनी वाढली असल्याचे हा अहवाल सांगतो. 

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या खासदार आणि आमदारांची संख्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक (प्रत्येकी 18) आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्यांना उमेदवारी देण्यात मागील पाच वर्षांत महाराष्ट्र (84) आघाडीवर आहे, त्या पाठोपाठ बिहारचा (75) क्रमांक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has maximum lawmakers facing cases of crime against women