गोव्यात माजी मुख्यमंत्र्यांचा ठेवला भाजपने मान

गोव्यात माजी मुख्यमंत्र्यांचा ठेवला भाजपने मान

पणजी : गेले काही महिने सातत्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान देणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपने प्रदेश निवडणुक समितीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबरीने स्थान दिले आहे. मांद्रे मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण भाजपच्या उमेदवाराआड लढणार अशी भूमिका पार्सेकर यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे.

गोवा विधानसभेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांचा काँग्रेसचे दयानंद सोपटे यांनी सात हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. मुख्यमंत्रीपदी असताना पराभूत होणारे पार्सेकर गोव्यातील पहिले उमेदवार ठरले होते. आता सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साहजिकपणे त्यांनाच भाजप आता मांद्रेतील विधानसभा पोट निवडणुकीवेळी उमेदवारी देणार आहे. ती उमेदवारी पक्ष बदलूना देऊ नये, आपल्याला किंवा पक्षाच्या अन्य निष्ठावंत कार्यकर्त्याला द्यावी, अशी मागणी पार्सेकर यांनी केली आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले आहे. यामुळे भाजपने मांद्रे मतदारसंघाची मंडळ समितीही बदलली तरी भाजपचे बहुतांश कार्यकर्ते पार्सेकर यांच्यासोबतच आहेत.

काणकोण मतदारसंघातून मागील निवडणुकीवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष लढलेले माजी मंत्री रमेश तवडकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये अलीकडेच फेरप्रवेश केला. पार्सेकर दोनवेळा आजारी पर्रीकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले होते. मात्र पर्रीकर यांनी आपणास भाजपचे काम पुढे न्या असे आवाहन केले मात्र  निवडणूक लढवू नका असे  सांगितल्याचे पार्सेकर यांनीच जाहीर केले आहे. ते माघार घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने सध्या त्यांना चुचकारण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. प्रदेश निवडणूक समितीवर पार्सेकर यांना मिळालेले स्थान ही त्याची सुरवात असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com