भाजप नेत्याच्या मोटारीने सुरक्षारक्षकाला नेले फरफटत

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

मोटार विरुद्ध बाजूने येत असल्याचे पाहून मी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने थेट माझ्या आंगावर मोटार घातली. मोटारीच्या बोनेटवर चढल्यामुळे जीव वाचला.

रेवाडी (हरियाणा) : भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश खोडा यांची मोटार विरुद्ध बाजूने आल्यानंतर सुरक्षारक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मोटारीने सुरक्षारक्षकाला धडक देत 300 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेवाडीच्या भाडावास रेल्वे फाटकावर ही घडली आहे. खोडा यांची मोटार रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत होती. यावेळी सुरक्षा रक्षक मोनू यादव यांनी मोटारीला हात दाखवत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटार न थांबताच पुढे आली व सुरक्षारक्षकाला फरफटत नेले. यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. यावेळी उपस्थितांपैंकी काही जणांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, मोनू यादव यांचा ओरडण्याचा आवाज व नागरिकांचा संताप पाहून भाजप नेते नेते सतीश खोडा यांनी घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी मोटारीच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोनू यादव म्हणाले, 'मोटार विरुद्ध बाजूने येत असल्याचे पाहून मी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने थेट माझ्या आंगावर मोटार घातली. मोटारीच्या बोनेटवर चढल्यामुळे जीव वाचला. 300 मीटर मला फरफटत नेले. यावेळी मी मोठमोठ्याने ओरडत होतो. माझ्या ओरडण्यामुळे नागरिक गोळा झाले व जीव वाचला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader drags homeguard officer on bonnet of his car at haryana