4 बायका, 40 मुलं; म्हणूनच लोकसंख्यावाढ- साक्षी महाराज

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

मी जे बोलले आहे, त्यावर ठाम आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीसाठी एकच समुदाय कारणीभूत आहे. ज्यांच्या चार बायका आणि 40 मुले आहेत. लोकसंख्यावाढीला हिंदू जबाबदार नाहीत.

मेरठ - चार बायका आणि 40 मुले असलेले नागरिकच भारताच्या लोकसंख्या वाढीस जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आज (शनिवार) केले. साक्षी महाराज यांनी मुस्लिमांना अप्रत्यक्षरित्या लोकसंख्यावाढीस जबाबदार ठरविले आहे.

मेरठमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना साक्षी महाराज यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

साक्षी महाराज म्हणाले, ''मी जे बोलले आहे, त्यावर ठाम आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीसाठी एकच समुदाय कारणीभूत आहे. ज्यांच्या चार बायका आणि 40 मुले आहेत. लोकसंख्यावाढीला हिंदू जबाबदार नाहीत. लवकरच सरकार समान नागरि कायदा लागू करेल, अशी आशा आहे.''

साक्षी महाराजांच्या या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेस नेते अखिलेश सिंह म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांपासून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी भाजप नेते अशी धार्मिक विधाने करत आहेत. भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे.

Web Title: BJP Leader Sakshi Maharaj Blames Muslims For Population Boom