लोकसभेत भाजप बहुमताच्या खाली; खासदारांची संख्या 272 वर

सोमवार, 21 मे 2018

नवी दिल्ली : 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) सद्यस्थितीला बहुमत मिळेल इतक्या जागा नसल्याचेही समोर आले आहे. सध्या भाजपकडे सभापतींचे मत धरून 272 खासदार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे स्वबळावर बहुमत सिद्ध करता येईल एवढे संख्याबळ नसल्याचे दिसते.

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या बी. एस. येडियुरप्पा आणि श्रीरामुलु यांनी खासदरकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेत 274 खासदार असलेल्या भाजपचा आकडा 272 वर आला आहे. या आकड्यामध्ये भाजपमधून निलंबित केलेले खासदार किर्ती आझाद यांचाही समावेश आहे. तसेच सतत पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठविणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हाही आहेत. सभापतींचे मत हे ग्राह्य धरले जात नसल्याने भाजपला बहुमतासाठी आवश्यक 272 जागांचा आकडा गाठणेही कठीण आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) म्हणून सत्तेत असलेल्या भाजपबद्दल बरेच मित्रपक्ष नाराज आहेत. चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडला आहे. तर, शिवसेनाही सतत भाजपवर कुरघोडी करत असते. त्यामुळे खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना नेत्यांचे राजीनामे कधी हातात येतील, याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, तर पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याने सरकार गमवावे लागण्याची शक्यता आहे. 

भाजपला आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशातील हक्काच्या फुलपूर आणि गोरखपूर या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता 28 मे रोजी होणाऱ्या चार लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला सर्वोतोपरी ताकद झोकून द्यावी लागणार आहे. तरच त्यांच्याकडे बहुमत मिळेल एवढे संख्याबळ असणार आहे. भाजपला काही ठिकाणी मित्रपक्ष शिवसेनेकडूनच लढत मिळत आहे. तर काँग्रेसने जुन्या मित्रांशी आघाडी केल्याने भाजपचा कस लागणार आहे.

Web Title: BJP losing its majority in Lok Sabha