गोव्यात भाजप विधीमंडळ गटाची बैठक; पर्रीकर यांच्याकडे लक्ष

अवित बगळे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री चित्रपट पाहतात
नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई या्ंनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्यावेळी ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटले. ते म्हणले, त्या भागात गेलो होतो म्हणून तेथे गेलो. मी त्यांच्यासोबत तासभर होतो. ते दूरचित्रवाणी संचावर द रिक्रुट हा इंग्रजी चित्रपट पाहत होते. ते निवांत वाटले. मीही तो चित्रपट याआधी पाहिलेला होता.

पणजी : गोव्यात सरकार आहे का याविषयीची जन आक्रोश यात्रा विरोधी पक्ष कॉंग्रेस येत्या ६ डिसेंबरपासून सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप विधीमंडळ गटाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी आज दुपारी साडेतीन वाजता होणार अाहे. मुख्यमंत्र्यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी गेल्या दोन महिन्यापासूनची मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. पुढील वाटचालीबाबत या बैठकीत मुख्यमंत्री कोणती भूमिका जाहीर करतील याकडे भाजपच्या नेत्यांप्रमाणेच इतर राजकीय नेत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा जानेवारी वा फेब्रुवारीत केली जाणार आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अजूनही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचे वाटप इतर मंत्र्यांकडे केलेले नाही. मुख्यमंत्री आजारी असतानाच दुसऱ्या क्रमांकांचे मंत्री सुदिन ढवळीकर व राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा पोर्तुगाल दौऱ्यावर गेले आहेत. या सगळ्या वातावरणात पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न बहुधा आजच्या बैठकीत केला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या बैठकीचे निरोप आमदारांना दिले गेले आहेत. भाजपचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी सूचना आल्या तर त्याविषयी नोंदी करण्यासाठी आणि कार्यवाही करण्यासाठी काही निवडक अधिकाऱ्यांनाही या बैठकीला बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री प्रशासकीय कामांचा आढावा घेणार आहेत.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी अलीकडच्या दिवसात तीन वेळा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या्ंची तिसऱ्यांदा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना भाजपचे पदाधिकारी भेटले होते. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकरही भेटले होते. त्यामुळे भाजपच्या आमदारांना ते कधी भेटणार असा प्रश्न निर्माण झाला होता. १८ ऑक्टोबरला दिल्लीतील एम्समधून गोव्यात परतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आणि राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक अशा दोन बैठका मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी घेतल्या होत्या.

नेतृत्वाबाबतचा गुंता कायम
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी आपण बोललो आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सरकारचे नेतृत्व सोपवण्यास त्यांची हरकत नसल्याचे सांगितले होते. आज सरदेसाई यांनी त्यावर भाष्य करणे टाळले ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदी सध्या मनोहर पर्रीकर आहेत त्यामुळे अन्य कोणाला संधी नाही. ते करत असलेल्या कामावर आम्ही व ते (मगो) समाधानी आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्रीपद भरण्याची गरज निर्माण होईल तेव्हाचे तेव्हा पाहू. तूर्त त्याबाबतच्या विचाराचीही गरज नाही.

मुख्यमंत्री चित्रपट पाहतात
नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई या्ंनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्यावेळी ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटले. ते म्हणले, त्या भागात गेलो होतो म्हणून तेथे गेलो. मी त्यांच्यासोबत तासभर होतो. ते दूरचित्रवाणी संचावर द रिक्रुट हा इंग्रजी चित्रपट पाहत होते. ते निवांत वाटले. मीही तो चित्रपट याआधी पाहिलेला होता.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता बैठक बोलावल्याचा निरोप त्यांच्या कार्यालयातून मिळाला आहे. बैठक कशासंदर्भात आहे याविषयी काही कळवलेले नाही. 
- प्रवीण झांटये, आमदार मये

Web Title: BJP meeting in Goa Manohar Parrikar attended