गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांचे निधन

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांचे निधन

पणजी- म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेली 25 वर्षे ते म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

गेली वीस वर्षे ते भाजपशी एकनिष्ठ राहिले. गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगावरील उपचारासाठी न्यूयॉर्कला नेण्यात आले  होते. तेथे असताना त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांच्या मृत्यूमुळे भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक चेहरा गमावला आहे. 

गोवा राजीव कॉंग्रेसच्या उमेदवारीवर 1999 मध्ये विधानसभेत पाऊल ठेवलेल्या डिसोझा यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यानंतर भाजपच्या उमेदवारीवर सलग चार वेळा म्हापशातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विश्‍वासू म्हणून ते गणले जात. भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपची विचारसरणी पूर्णपणे अंगीकारली होती. त्यातूनच ख्रिस्ती हिंदू वाद त्यांच्या वक्‍तव्यामुळे निर्माण झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानात राहणारा तो हिंदू अशी व्याख्या केली होती. त्यावर मत व्यक्त करताना त्या अर्थाने मी हिंदू पण मी ख्रिस्ती हिंदू असे त्यांनी म्हटले होते. 

भाजपच्या मंत्रिमंडळात त्यांचे स्थान नेहमीच वरचे असे. 2012 च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पर्रीकर हे संरक्षणमंत्रीपदी निघून गेल्यावर डिसोझा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होणार अशी चर्चा होती. त्यांनीही तशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपने ही संधी तत्कालीन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दिली. 2017 च्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे मंत्रीमंडळातील दुसरे स्थान सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, तिसरे स्थान नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांना द्यावे लागले. तरीही डिसोझा यांनी ते समजून घेतले. त्यांच्याकडे नगरविकासखाते होते. कर्करोगावरील उपचारासाठी ते न्यूयॉर्कला असताना त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्याला साधी कल्पनाही दिली नाही, निदान सांगितले असते तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नाराज नेते त्यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी जमले होते त्यावेळीही डिसोझा काहीतरी करतील असे वाटले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते विधानसभेतही येऊ शकले नाहीत. 

गेल्या अनेक वर्षाच्या वाटचालीत भाजपमध्ये अनेक अल्पसंख्याक नेत्यांनी प्रवेश घेतला, ते निघूनही गेले. मात्र डिसोझा सातत्याने भाजपसोबतच राहिले. भाजपच्या धोरणाचा जाहीर पुरस्कार करत राहिले. म्हापशाच्या जनतेचे 25 वर्षे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी भाजपचा ख्रिस्ती चेहरा अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती. 
भाजपमध्ये आजही अनेक ख्रिस्ती आमदार, मंत्री आहेत. मात्र ते भाजपचा चेहरा ठरू शकत नाहीत. जनमानसात डिसोझा आणि भाजप असे समीकरण पुरतेपणी रुजले होते. आता 30 टक्के अल्पसंख्याक मते असलेल्या या राज्यात राजकारण करताना भाजपला या चेहऱ्याची उणीव सातत्याने जाणवत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com