कर्नाटकात भाजपमध्ये असंतोषाचा भडका; आमदारांची नाराजी उघड

yeddyurappa
yeddyurappa

बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा रेंगाळलेला विस्तार तब्बल 25 दिवसांनंतर मंगळवारी करण्यात आला. मंत्रिमंडळात 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराचा सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर शेवट झाला. मात्र, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना नाराज आमदारांची नवी डोकेदुखी होण्याचे आज स्पष्ट झाले. संधी न मिळालेल्या अनेक आमदारांनी नाराजी उघड केली आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या काही आमदारांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. चित्रदुर्गसह काही मतदारसंघांत असंतोषाचा भडका उडाला आहे. शपथविधी कार्यक्रमाला अनुपस्थित राहून काही आमदारांनी आपली नाराजी उघड केली, तर काही जणांनी थेट भाजपविरोधात वक्तव्य करून नाराजीचा सूर आळविला. गुळहट्टी शेखर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. "मी भाजपमध्ये दाखल झालो हीच चूक केली,' असे ते म्हणाले. येडियुरप्पा यांचे निकटवर्ती म्हणून ओळखण्यात येणारे तिप्पारेड्डी मंत्रिपदापासून वंचित झाले. त्यांनीही उघडपणे भाजपविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या समर्थकांनी आज चित्रदुर्ग येथे जोरदार निदर्शने केली. रस्त्यावर टायर जाळून व निषेधाच्या घोषणा दिल्या.

बेळगाव जिल्ह्यातून निपाणीच्या शशिकला जोल्ले यांचा समावेश अपेक्षितच होता. मात्र, माजी आमदार लक्ष्मण सवदी यांचा समावेश आश्‍चर्यकारक ठरला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी काल रात्री मंत्र्यांच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर सतरा आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. गेल्या निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. 14 महिन्यांच्या धडपडीनंतर गमावलेली संधी त्यांना परत मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या रचनेत पक्षाने सामाजिक न्यायाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला असून ब्राह्मण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास जातींसह सर्व समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल व्ही. आर. वाला यांनी राजभवनात आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना अधिकाराची व गोपनीयतेची शपथ दिली. 

माजी मुख्यमंत्री झाले मंत्री 
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा मंत्रिमंडळातील समावेश विशेष मानण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या व्यक्तीचा मंत्रिपदावर समावेश हा इतिहासातील दुर्मीळ प्रसंग आहे. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात सात लिंगायत, तीन वक्कलीग, दोन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, धनगर, बिल्ल आणि लमाणी समाजाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com