
भाजपने ममतांच्या तृणमूल काँग्रेसमधील 8 नेत्यांना पक्षात घेऊन मोठा हादरा दिला होता. त्यानंतर आता भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हालचाली करत आहेत. यात आधी भाजपने ममतांच्या तृणमूल काँग्रेसमधील 8 नेत्यांना पक्षात घेऊन मोठा हादरा दिला होता. त्यानंतर आता भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजप खासदार सौमित्र खआन यांनी आता पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मंडल यांनी सांगितलं की, मी भाजप आणि माझ्या पतीसाठी लढाई लढली होती. आम्हाला तिकिट मिळालं आणि लोकसभेत विजय मिळवला. मला वाटतं की, भाजपमध्ये आता फक्त संधीसाधूंनाच जागा मिळत आहे.
आम्ही पार्टीसाठी तेव्हा काम केलं जेव्हा आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं की, पक्ष 2 पासून 18 जागा जिंकेल. कोणती सुरक्षा नव्हती की कोणता पाठिंबा. आम्ही जनतेच्या पाठिंब्याने लढलो आणि जिंकलो. मला आताही वाटतं की मी एक लढाई लढत आहे. मात्र माझ्यासाठी भाजपमध्ये काही आदर राहिला नाही असंही सुजाता यांनी सांगितलं.
हे वाचा - पत्नीचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप खासदार म्हणाले, मला न सांगताच घेतला निर्णय
शुभेंदु अधिकारी हे भाजपमध्ये गेल्याबद्दल विचारले असता सुजाता मंडल यांनी सांगितलं की, मला कळत नाही की दागिने शुद्ध करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या साबणाचा वापर केला जातो. आम्ही पक्षासाठी लढाई लढलो. आयुष्याचा शेवटचा दिवस असू शकतो अशी परिस्थिती होती. आता आम्ही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली लढणार.
भाजपवर टीका करताना सुजाता मंडल म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये अजुनही भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे 6 दावेदार आणि उपमुख्यमंत्रीपदाचे 13 दावेदार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि तेच राहतील. ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाहीत. जेव्हा आम्ही भाजपच्या नेतृत्वाबाबत विचारतो तेव्हा कोणीही उत्तर देत नाही.
हे वाचा - 'बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणेही कठीण; माझं टि्वट सेव्ह करा, नाहीतर...'
सुजाता मंडल यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचे पती आणि भाजप खासदार सौमित्र खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. यासोबतच सुजाता यांच्या घरी तैनात असलेले सुरक्षा रक्षकही काढून घेण्यात आले आहेत. सौमित्र खान आणि सुजाता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा होती. आता दोघांमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे.
पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांनी सांगितलं की, हे खरं आहे की आमच्या कुटुंबात मतभेद होते. कुटुंब आहे म्हटल्यावर भांडण होणारच. मात्र याला राजकीय रंग देणं योग्य नाही. मला दु:ख आहे की माझ्या भाजपमध्ये जाण्याने तिला नोकरी गमवावी लागली. सुजाता तिच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी तृणमूलमध्ये गेली आहे.