लोकसभेतील भाजपचे संख्याबळ घटले; काँग्रेसचे सदस्य वाढले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

"नकारात्मक शक्तींचा वध' 
या विजयावर कॉंग्रेसने "कर्नाटकमध्ये नकारात्मक शक्तींचा वध झाला' असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले, की देशाचा मूड बदलतो आहे, हा संकेत कर्नाटकच्या निवडणुकीतून मिळत आहे. पी. चिदंबरम यांनी विजयाचे श्रेय कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएसच्या आघाडीला देताना आघाडीची तुलना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी संघामध्ये विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाशी केली आहे. 

नवी दिल्ली : कर्नाटकमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांनी सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. पोटनिवडणुकांमधील सातत्यपूर्ण अपयशामुळे मोदी सरकारचे संख्याबळ 282 वरून 272 वर येऊन ठेपले आहे, तर 44 या नीचांकी संख्येवर पोहोचलेल्या कॉंग्रेसचे संख्याबळ या विजयामुळे 49 झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांतले यश "दिवाळी भेट' मानताना कॉंग्रेसने हा नकारात्मक शक्तींचा वध झाल्याचा टोला सत्ताधारी भाजपला लगावला आहे. 

कर्नाटकातील बळ्ळारी आणि शिमोगा हे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होते, तर मंड्या मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) ताब्यात होता. यात भाजपला केवळ शिमोगा मतदारसंघ कायम राखता आला आहे. बळ्ळारीच्या बहुचर्चित जागेवर कॉंग्रेसने विजयश्री खेचून आणली आहे. या पराभवाने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 282 असा एकहाती स्पष्ट बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपला नंतरच्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र हे यश कायम राखता आले नाही. एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागल्यामुळेही लोकसभेत भाजपचे बहुमताला उतरती कळा लागली असून, त्यात शिमोगा आणि बळ्ळारीतील पराभवाची भर पडली आहे. 545 सदस्य संख्येच्या लोकसभेत दोन राष्ट्रपती नियुक्त अँग्लोइंडियन सदस्य असल्यामुळे प्रत्यक्ष बहुमताचा आकडा 272 आहे. सध्या जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग, आंध्र प्रदेशातील कडप्पा, नेल्लोर, ओन्गोल, राजमपेट, तसेच तिरुपती, केरळमधील कोट्टायम आणि मेघालयातील तुरा हे मतदारसंघ रिक्त आहेत. 

भोलासिंह यांच्या निधनामुळे बिहारमधील बेगुसराय हा मतदारसंघ त्यात वाढला आहे. तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यत्वासोबतच बिहारमधील कटिहारच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा स्वीकारल्याची औपचारिक घोषणा लोकसभाध्यक्षांकडून झाल्यास रिक्त मतदारसंघांमध्ये कटीहारचेही नाव जोडले जाईल. तसे झाल्यास रिक्त मतदारसंघांची संख्या दहा होईल. साहजिकच यामुळे लोकसभेचे एकूण संख्याबळही 533 होणार असल्याने सभागृहातील एकूण संख्येनुसार भाजपच्या स्पष्ट बहुमतावर परिणाम होणार नाही. परंतु हे घटते संख्याबळ सत्ताधाऱ्यांचे मनोधैर्य खचविणारे असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीला उरलेला अल्प कालावधी पाहता रिक्त जागांवर पोटनिवडणुकांची शक्‍यताही अत्यल्प मानली जात आहे. 

"नकारात्मक शक्तींचा वध' 
या विजयावर कॉंग्रेसने "कर्नाटकमध्ये नकारात्मक शक्तींचा वध झाला' असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले, की देशाचा मूड बदलतो आहे, हा संकेत कर्नाटकच्या निवडणुकीतून मिळत आहे. पी. चिदंबरम यांनी विजयाचे श्रेय कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएसच्या आघाडीला देताना आघाडीची तुलना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी संघामध्ये विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाशी केली आहे. 

लोकसभेत सध्या... 

272 
भाजपचे संख्याबळ 

49 
कॉंग्रेसचे संख्याबळ 

272 
प्रत्यक्ष बहुमताचा आकडा 

Web Title: BJP MPs count in Loksabha decreased and Congress count gained