esakal | भाजपच्या ‘राजा’ची झोळी रिकामीच

बोलून बातमी शोधा


BJP National Secretary Hariharan Raja
भाजपच्या ‘राजा’ची झोळी रिकामीच
sakal_logo
By
टीम ई सकाळ

चेन्नई : वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय चिटणीस हरिहरन राजा (Hariharan Raja) यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. तमिळनाडूतील करायकुडी विधानसभा मतदारसंघातून (Karaikudi constituency in the Tamil Nadu) निवडणुकीत लढविणाऱ्या राजा यांना काँग्रेसच्या एस. मनगुंडी यांच्याकडून हार पत्करावी लागली. राजा यांना ५४ हजार २६ मते पडली. सुमारे २० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही हरिहरन राजा यांना काँग्रेसचे कार्ति चिदंबरम (karti chidambaram) यांच्याविरोधात पराभवाचा धक्का बसला होता.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये दारुचे दर वाढले; UP सरकारचा मोठा निर्णय

त्यावेळी शिवगंगा मतदारसंघातून चिदंबरम यांचा तीन लाख ३२ हजार २४४ मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वी याच मतदारसंघातून त्यांना १९९९ आणि २०१४मधील निवडणुकीतही राजा यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच २००१, २००६ आणि २०१६ मधील विधानसभा निवडणुकीतही ते पराजित झाले होते. गेल्या सात निवडणुकांमधील यंदाची त्यांची सहावी हार आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राजा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. भारत आणि गाइडच्या तमिळनाडू अध्यक्षपदाच्या २०१७ मधील निवडणुकीतही ते विजयापासून दूरच होते.

भाजप १५ वर्षांनंतर विधानसभेत

दरम्यान, तमिळनाडूच्या विधानसभेत भाजपचा १५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा प्रवेश झाला आहे. राज्यात १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत कन्याकुमारी जिल्ह्यातील पद्मनपुरम मतदारसंघातून भाजपच्या वेलायूतम यांनी विजय मिळवीत विधानसभेत भाजपचे अस्तित्व निर्माण केले होते. त्यानंतर द्रमुकच्या मदतीने २००१मध्ये भाजपने चार जागा मिळविल्या होत्या. यंदा अण्णाद्रमुकच्या साथीत निवडणूक लढविताना भाजपचे चार उमेदवार विजयी झाले.

कमल हसन यांना धक्का

भाजपच्या महिला शाखेच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांचा पराभव करीत विधानसभेत प्रथमच पाऊल ठेवणार आहेत. अन्य प्रमुख विजेत्यांमध्ये अण्णाद्रमुकचे मंत्री नैनार नागेंद्रन यांचा समावेश आहे. याचवेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष एल. मुरुगन, माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई आणि अभिनेत्री खुशबू यांना द्रमुकच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला.

BJP National Secretary Hariharan Raja loss Karaikudi constituency in the Tamil Nadu