'भाजपकडून आमदारांना 30 कोटींची ऑफर' 

bjp
bjp

बंगळूर : भाजपने आमदार खरेदीचा घोडेबाजार सुरू केला असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी केला. प्रत्येक आमदाराला 25 ते 30 कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. म्हैसूर येथील मंडकळ्ळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. 

भाजप वाममार्गाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदारांना खरेदी करण्यासाठी इतका पैसा आला कुठून? असा प्रश्न करून भ्रष्टाचारातून मिळविलेला पैसा आमदार खरेदीसाठी वापरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 104 जागा जिंकून सत्तेवर येणे कसे शक्‍य आहे? लोकशाहीत बहुमत असेल, तरच सत्तेवर येता येते, हे साधे ज्ञान असणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. 
भाजपात कोणतेच आमदार जाणार नाहीत. आमदारांना खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. लवकरच धजद-कॉंग्रेसकडून महामंडळावरील अध्यक्षांची अधिकृत नियुक्ती होईल. नियुक्तीसंबंधात अंतिम रूपरेषा लवकरच तयार करण्यात येईल. सध्या कॉंग्रेसने 20 जणांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत. एकूण 30 जणांची महामंडळावर नियुक्ती करण्यात येईल. 

माजी मंत्री रमेश जारकीहोळी दिल्लीला गेल्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी तुम्हाला काही सांगितले आहे का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ""रमेश जारकीहोळी यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. ते दिल्लीत आहेत की मुंबईत आहेत, येथे आहेत, तेथे आहेत, अशा अफवांवर आपण प्रतिक्रिया देणार नाही. या संबंधात तुम्हाला काही माहीत आहे का? असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. 

उपमुख्यमंत्री परमेश्वर यांच्याजवळील गृहमंत्रिपद दुसऱ्याला देऊन दलितावर अन्याय केल्याचा आरोप एच. डी. रेवण्णा यांनी केला असल्याचे सांगताच, त्याला मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी चांगले उत्तर दिले असल्याचे ते म्हणाले. 

सत्ता मिळविण्याचा विफल प्रयत्न 
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तेवर येण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. रमेश जारकीहोळी 25 वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात आहेत. पक्षानेही त्यांना अनेक वेळा संधी दिली असल्याचे लोकसभेतील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत धजदशी युती करण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. दोन्ही पक्षात चर्चा झाल्यानंतरच कोणाला किती जागा, याचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com