भाजपची काँग्रेस आमदाराला मंत्रीपदाची ऑफर

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

'मला भाजपच्या नेत्यांचा फोन आला व त्यांनी भाजपमध्ये आल्यास मंत्रीपद देऊ असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला, पण मी अशी कोणतीही ऑफर स्विकारणार नाही, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीच होतील', असेही अमरगौडा यांनी सांगितले.

बंगळूर : काल (ता. 15) कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाल्यानंतर प्रथम भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने त्यांचेच सरकार स्थापन होईल असे चित्र होते, मात्र भाजपला 104 जागा मिळाल्या व सरकार स्थापनेसाठी 112 जागा असणे आवश्यक असते.

याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला व सत्ता स्थापनेकडे एक पाउल पुढे टाकले. त्यामुळे भाजपलाही आता सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कर्नाटकात भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. 

काँग्रेसचे नेते अमरगौडा लिंगानागौडा पाटील बय्यापूर यांना भाजपने मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पण विधानसभेतील एका जागेसाठी व मंत्रीपदासाठी मी काँग्रेससोबत असलेली निष्ठा मोडणार नाही, असे अमरगौडा यांनी सांगितले. 'मला भाजपच्या नेत्यांचा फोन आला व त्यांनी भाजपमध्ये आल्यास मंत्रीपद देऊ असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला, पण मी अशी कोणतीही ऑफर स्विकारणार नाही, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीच होतील', असेही अमरगौडा यांनी सांगितले. 

काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा देत, त्यांचेचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव काँग्रेसमधील काही नेत्यांना मान्य नसल्याच्या अफवाही पसरल्या आहेत.

काल माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी युती करून सत्तास्थापनेचा दावा कर्नाटकच्या राज्यपालांसमोर केला. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे, त्यामुळे इतर पक्षातील आमदार आपल्याकडे वळवण्याचे राजकारण चालू झाले आहे. 

Web Title: bjp offers ministry to congress leader in karnataka