esakal | 40 वर्षे सेवा करणाऱ्याला खास 'भेट', भाजपने कार्यकारिणीतून वगळल्याने नेत्याची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda

एका योद्ध्याप्रमाणे 40 वर्षे भाजपची सेवा केली आणि आज भाजपने मला 'भेट' दिली असा उपहासात्मक टोलाही नेत्याने नाराजी व्यक्त करताना लगावला.

40 वर्षे सेवा करणाऱ्याला खास 'भेट', भाजपने कार्यकारिणीतून वगळल्याने नेत्याची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - बिहार निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर लगेच भाजपने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. अमित शहा यांच्याकडून अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 8 महिन्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणीत जेपी नड्डा यांनी बदल केले. यावेळी नव्या आणि तरुण चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. तर अनेक जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांना कार्यकारिणीतून वगळलं आहे. पक्षाने मुकुल रॉय यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं असून भाजपच्या नव्या टीममध्ये उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, आता पक्षाच्या कार्यकारिणीत झालेल्या या फेरबदलानंतर राहुल सिन्हा नाराज झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक वेगळी ओळख असलेले राहुल सिन्हा भाजपचे राष्ट्रीय सचिव होते मात्र आता त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहेत.

नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर राहुल सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करताना मत मांडलं आहे. पक्षाच्या या निर्णयावर बोलताना राहुल सिन्हा यांनी म्हटलं की, एका योद्ध्याप्रमाणे 40 वर्षे भाजपची सेवा केली आणि आज टीएमसी नेत्यांसाठी मला राजीनामा द्या असं सांगण्यात आलं. भाजपने मला 'भेट' दिली असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. राहुल सिन्हा म्हणाले की, पुढच्या 10-12 दिवसात पक्षाच्या निर्णयाबाबत माझी बाजू मांडणार आहे. तसंच पुढे काय करणार हेसुद्धा स्पष्ट करेन. 

तृणमूल काँग्रेस सोडून मुकुल रॉय भाजपमध्ये आले आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल यांनी स्पष्ट केलं होतं की, ते फक्त नाव नाही तर पक्षात किंवा सरकारमध्ये मोठं पद हवं आहे. सुरुवातीला असंही सांगितलं जात होतं की, मुकुल यांना पक्षाकडून मोठं पद दिलं जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र पक्षाने नव्या कार्यकारिणीत त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं. त्यामुळेच राहुल सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हे वाचा - राज्यात एका बाजुला पडलेले भाजप नेते राष्ट्रीय कार्यकारिणीत

भाजपने पश्चिम बंगालमध्ये हळू हळू पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे. सत्तारुढ टीएमसीविरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधकांना मागे टाकून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप उभा राहिला आहे. 2021 मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने मुकुल रॉय यांना पद देऊन नवी खेळी केली असल्याचं म्हटलं जात आहे.