#DecodingElections : काँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे.

देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाचपैकी तीन राज्यांमध्ये वर्चस्व मिळवीत देशात आणखी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे देशात आता पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता असणार हे निश्चित आहे.

वर्षभरापूर्वी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला होता. आता आज याच अध्यक्षांना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसने तीन राज्यांतील सत्तेचे गिफ्ट दिले आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींना लगेच गुजरातमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. पण, गुजरातमध्ये मिळालेली लोकप्रियता नरेंद्र मोदींसारख्या गुजराती माणसासमोर राहुल गांधी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहण्यास पुरेशी ठरली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींना अपयश मिळाले असूनही काँग्रेसने गांधी घरण्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. आता या तीन राज्यांत मिळालेल्या यशानंतर हे निश्चित झाले आहे, की भाजपचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर यांच्यावर टीका झाली होती. पण, आता देशातील जनतेनेच काँग्रेसच्या बाजूने कौल देत सुरवातीला पंजाबमध्ये सत्ता दिली होती. त्यानंतर कर्नाटकमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊन धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. मिझोराममध्ये काँग्रेस यापूर्वीच सत्तेत होते. पण, आता त्यांच्या हातातून ते राज्य गेले आहे. अगदी एक-दोन राज्यांत अस्तित्वात असलेली काँग्रेस आता मोठ-मोठ्या राज्यांतही सत्ता काबीज करत आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटबंदी, बेरोजगारी, राफेल करार यासारख्या मुद्द्यांवरून भाजपला जेरीस आणणाऱ्या राहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवून भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. भाजपचे हे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे.

Web Title: BJP s dream of congress mukt bharat spoiled